पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Pakistan PM Shehbaz Sharif) यांना आता दोन्ही देशांना युद्ध परवडणार नाही सांगत भारताकडे चर्चेसाठी आवाहन केलं आहे. यानंतर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणालेत की, "आम्हीदेखील रिपोर्ट पाहिले आहेत. भारताने नेहमीच सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण यासाठी दहशतवादमुक्त वातावरण असलं पाहिजे". भारताने यावेळी पाकिस्तानातून भारताता आलेली सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू (Anju) यांच्यावरही भाष्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेल्या सीम हैदर प्रकरणावर बोलताना अरिंदम बागची यांनी सांगितलं की, तपास यंत्रणा याप्रकरणी तपास करत आहेत. पण अंजूचं प्रकरण हा परराष्ट्र धोरणाचा भाग नाही. तो एक खासगी दौरा होता. पुढे ते म्हणाले की, पाकिस्तान वारंवार काश्मीरचा मुद्दा उचलतो. आपला प्रोपगंडा पसरवण्यासाठी ते वारंवार असं करत असतात. आम्ही पाकिस्तानच्या या प्रोपगंडाला फार गांभीर्याने घेऊ इच्छित नाही. 


परराष्ट्र मंत्रालयाने यावेळी स्पष्ट केलं आहे की, "भारत सध्या जी-20 वगळता इतर कोणतीही बैठक घेत नाही आहे. जर जी-20 परिषद वगळता इतर देशासह बैठक होत असेल तर आता त्यावर भाष्य करु शकत नाही".


पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले आहेत?


इस्लामाबादमध्ये आयोजित पाकिस्तान खनिज शिखर संमेलनात शहबाज शरीफ यांनी भारताला चर्चेसाठी आवाहन केलं. "जर आपला शेजारी देश (भारत) गंभीर असेल तर आपण (पाकिस्तान) चर्चेसाठी तयार आहोत," असं शहबाज शरीफ यांनी सांगितलं. तसंच पुढे ते म्हणाले की, "गेल्या 75 वर्षात भारत आणि पाकिस्तानने तीन युद्धं लढली आहेत. या युद्धांमुळे गरिबी, बेरोजगारी आणि साधनांची कमतरता निर्माण झाली. युद्ध हा काही आता पर्याय नाही". 


शहबाज शरीफ यांनी 1965 (काश्मीर युद्ध), 1971 (बांगलादेश विभाजन), 1999 (कारगील युद्ध)  यांचा उल्लेख केला आहे. या तिन्ही युद्धांमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. 


पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी यावेळी अण्वस्त्रांचाही उल्लेख केला. ते म्हणाले "पाकिस्तानकडे अण्वस्त्रं आहेत. पण ही अण्वस्त्रं आक्रमक होण्यासाठी नाही, तर आपली रक्षा करण्यासाठी आहेत. परमेश्वराने असं करु नये, पण जर उद्या अण्वस्त्र युद्धाची स्थिती निर्माण झाली तर काय झालं होतं हे सांगण्यासाठी एकजणही जिवंत नसेल. युद्ध हा पर्याय नाही".