अरे बापरे... देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी महाराष्ट्रात सर्वाधिक ६३३० रुग्ण आढळून आले.
नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २०,९०३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णांच्या झपाट्याने वाढत असलेल्या या संख्येपुढे देशातील आरोग्य यंत्रणा कशी पुरी पडणार, हा प्रश्न आता उभा ठाकला आहे.
आता कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही, सरकारचा नवा नियम
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६,२५,५४४ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी २,२७, ४३९ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ३,७९,८९२ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, आतापर्यंत देशभरात १८, २१३ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गुरुवारी महाराष्ट्रात सर्वाधिक ६३३० रुग्ण आढळून आले. आतापर्यंत महाराष्ट्रातील १,८६,६२६ लोकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ८,१७८ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक शहरे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आली आहे. मात्र, तरीही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.
महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतील परिस्थिती चिंताजनक आहे. एकट्या दिल्ली शहरात आतापर्यंत कोरोनाचे ९२,१७५ रुग्ण सापडले आहेत. यापैकी २,८६४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तामिळनाडूमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ९८,३९२ वर जाऊन पोहोचली आहे.