Airstrike ...या ट्विटमुळे होतंय पाकिस्तानचं हसं
या हल्ल्याची अधिकृत माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडूनही देण्यात आली.
मुंबई : बारा दिवसांपूर्वी भारताच्या पुलवामा जिल्ह्यात जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचं भारताने मंगळवारी म्हणजे २६ फेब्रुवारीला चोख उत्तर दिलं आहे. भारतीय वायुदलाच्या सहाय्याने पाकव्याप्त काश्मीरमधील प्रांतात असणाऱ्या दहशतवादी तळांवर हल्ला करत भारतीय संरक्षण दलाकडून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अतिशय गोपनियता राखत करण्यात आलेल्या या हल्ल्याची अधिकृत माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडूनही देण्यात आली.
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या दहशतवादी तळावर भारताकडून हल्ला करण्यात आल्याचं वृत्त जाहीर केलं. मुख्य म्हणजे इथे भारताकडून हल्ल्याची माहिती जाहीर होण्यापूर्वीच पाकिस्तानने असा दावा केला होता की भारतीय वायुदलाच्या विमानांना त्यांच्या वायुदलाने परतवून लावलं. पण, मुळात मात्र वेगळीच परिस्थिती समोर आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या वायुदलातील विमानांची भारतीय लढाऊ विमानं पाहून चांगलीच घाबरगुंडी पाहायला मिळाली होती.
पाकिस्तानच्या अतिआत्मविश्वासाचं आणखी एक उदाहरण सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळालं. 'पाकिस्तान डिफेन्स' नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो सोमवारी रात्री पोस्ट करण्यात आला. या फोटोसह लिहिण्यात आलं होतं, "Sleep tight because PAF is awake." 'निर्धास्त झोपा कारण, पाकिस्तान वायुदल जागत आहे...', अशा आशयाचं ट्विट करणऱ्या या राष्ट्राला पुढच्या काही तासांमध्ये भारताने चांगलाच दणका दिला. पाकिस्तान सैन्यदलाच्या या फॅन पेजवरची ही पोस्ट पाहून काही तासांनंतरच भारतीय वायुदलाने केलेल्या हल्ल्यानंतर त्या पोस्टची बरीच खिल्ली उडवण्यात आली.
'जागं राहू काय केलं....?, असा प्रश्न कोणी उपस्थित केला. तर, कोणी या साऱ्याला विनोदी अंगाने पाहात, कोणी त्यावर मीम्स साकारत पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. फॅन पेजवरुन करण्यात आलेलं हे ट्विट आणि त्यानंतर पाकिस्तानवर झालेला सैन्यदलाचा हल्ला पाहता आता यावर काही प्रतिक्रिया किंवा सोशल मीडिया पोस्ट केली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.