`भारतीय भूमीत दहशतवादी हल्ला झाला, तर याद राखा`
पाकिस्तानला इशारा देत ते म्हणाले....
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या नियंत्रण रेषेपाशी कायमच तणावाचं वातावरण पाहायला मिळतं. त्याशिवा. जम्मू काश्मीर भागात शेजारी राष्ट्राकडून सातत्यानं कुरापती सुरुच असतात. दहशतवादी कारवाया करत त्यांच्याकडून वारंवार भारतीय हद्दीत घुसखोरी करत अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरुच असतात. याच पार्श्वभूमीवर भारतीय वायुदल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी पाकिस्तानचा कडक इशारा दिला.
जेव्हा जेव्हा भारतीय भूमीवर पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ला केला जाईल तेव्हा तेव्हा पाकिस्तानने चिंता केलीच पाहिजे. त्यांना या चिंतेतून बाहेर पडायचं असेल तर, सर्वप्रथम या कुरपती थांबवत दहशतवादी कारवाया बंद केल्या पाहिजेत असा इशारा त्यांनी दिला.
वाचा : दिलासादायक : युरोपातील 'हा' देश कोरोना मुक्त
'एएनआय' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना भदौरिया यांनी आपली ठाम भूमिका मांडली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालणाऱ्या दहशतवादी तळांवर हल्ला करण्याची जेव्हा जेव्हा गरज उदभवली आहे, तेव्हा तेव्हा भारतीय वायुदल चोवीस तास सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी दिला. पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून हवाई हद्द विस्तारण्याच्या प्रयत्नंन असून, सीमेपलीकडून सातत्याने हुलकावणी देणं सुरु आहे. हंदवाडामधील दहशतवादी हल्ल्याची परतफेड भारताकडून केली जाणार असल्याची भीतीही शेजारी राष्ट्राच्या सैन्यात असल्याचं वृत्तं आहे.
काही दिवसांपूर्वीच जम्मू- काश्मीरच्या हंदवाडा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह आणखी तिघांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्याआधीपासूनच रात्रीच्या वेळी पाकिस्तानकडून भारतीय सीमेच्या दिशेने होणाऱ्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याचंही वृत्त आहे. ज्यामध्ये रात्रीच्या वेळी हवाई हद्दीत शेजारी राष्ट्राकडून काही हालचालीही पाहायला मिळत आहेत.
जम्मू- काश्मीर येथील तणावाचं वातावरण आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेतील ही एकंदर परिस्थिती पाहता, गरज भासल्यास भारतीय वायुदल चोवीस तास पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय असणारे दहशतवादी तळ उध्वस्त करण्यास सुसज्ज आहे, असं भदौरिया हमी देत म्हणाले.