उत्तर प्रदेश : सोमवारी सकाळी भारतीय वायुदलाच्या जॅग्वार या लढाऊ विमानाला अपघात झाला आहे. उत्तर प्रदेश येथील कुशीनगर परिसरात मोकळ्या भागात हे लढाऊ विमान क्रॅश झाल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैमानिकाने यातून स्वत:चा जीव वावल्याचं कळत आहे. गोरखपूर हवाई तळावरुन जॅग्वॉरचं उड्डाण झालं होतं.





सोमवारी सकाळी हेतिमपूर येथे हा अपघात घडला. मुख्य म्हणजे या परिसरापासून काही अंतरावरच वस्ती असल्याचीही माहिती समोर येत आहे. हा अपघात होण्याच्या काही क्षणांआधीच वैमानिकाने पॅराशूटच्या मदतीने विमानाबाहेर येत आपले प्राण वाचवण्यात यश मिळवलं. ज्यानंतर हे विमान, शेतात पडून त्याने पेट घेतला. भारतीय वायुदलाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे विमान त्याच्या रोजच्या मोहिमेवर होतं. दरम्यान या अपघाताच्या चौकशीचे आदेश वायुदलाकडून देण्यात आले आहेत.