J&K: राजौरीत सुरक्षा दलांनी पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला
कल्लार येथे आयईडीचा स्फोट घडवून आणण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला होता.
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलांनी पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. जम्मू-पुंछ महामार्गावरील कल्लार येथे आयईडीचा स्फोट घडवून आणण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला होता. मात्र, सुरक्षा दलांना वेळीच या हल्ल्याचा सुगावा लागला. यानंतर भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी या परिसराला घेराव घातला. परिसरात शोध घेतला असता स्फोटके आढळून आली. यानंतर रस्त्यावरील वाहतूक थांबवून ही स्फोटके उद्ध्वस्त करण्यात आली. सुरक्षा दलांनी वेळीच कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा पुलवामासारख्या आणखी एका दहशतवादी हल्ल्याला सामोरे जावे लागले असते.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या ऑपरेशन ऑलआऊटमुळे दहशतवाद्यांची मोठी कोंडी झाली आहे. गेल्या १८ दिवसांत भारतीय लष्कराने १८ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यामुळेच सैरभैर झालेल्या दहशतवाद्यांनी जम्मू-पुंछ महामार्गावर स्फोट घडवण्याचा कट आखला होता.
यापूर्वी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या वाहनांचा ताफा रस्त्यावरून जात असताना दहशतवाद्यांनी भीषण स्फोट घडवून आणला होता. यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या घटनेचे संपूर्ण देशभरात पडसाद उमटले होते. अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यानंतर भारतीय वायूदलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करत जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त केले होते.