घुसखोरी हाणून पाडत भारतीय सैन्याचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर ; ४ दहशतवादी ठार
गोळीबारात पाकिस्तानी सैनिकही ठार झाल्याची माहिती
मुंबई : भारतीय सैन्यदलाकडून पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम Border Action Team (BAT) अर्थात 'बॅट'च्या अत्यंत मोठ्या कारवाईला हाणून पाडण्यात आलं आहे. ३१ जुलै रोजी पाकिस्तानकडून जम्मू- काश्मीरच्या केरान सेक्टर येथे असणाऱ्या भारतीय सैन्याच्या चौक्यांना निशाणा करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच ही कारवाई करण्यात आली.
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सैन्याने यशस्वीपणे शत्रूचे मनसुबे उधळून लावले. ज्याची मोठी भरपाई आणि फटका शेजारी राष्ट्राच्या सैन्यदलाला बसला आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत भारताकडून पाकिस्तान सैन्याच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुप अर्थात 'एसएसजी'च्या चार सैनिकांना ठार करण्यात आल्याचं कळत आहे.
मुख्य म्हणजे प्रत्युत्तरात करण्यात आलेल्या गोळीबारात पाकिस्तानी सैनिकांसोबतच सीमेपलीकडील भागात 'एलओसी'नजीक सक्रिय असणाऱ्या ४ दहशतवाद्यांचा खात्माही केल्याची बाब समोर येत आहे.
पाकिस्तान आणि भारत या दोन्ही सैन्यदलांमध्ये झालेल्या चकमकीनंतर पुरावा म्हणून भारतीय जवानांकडून अतिरेक्यांच्या मृतदेहांची छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान सध्याच्या घडीला त्यांचे मृतदेह हे नियंत्रण रेषेनजीकच असून, ते भारताच्या ताब्यात घेतले जाऊ नयेत यासाठी पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरुच ठेवण्यात आला आहे.
भारताकडून बोफोर्सचा वापर - सूत्र
पाकिस्तानच्या सैन्यदलाकडून भारतीय सैन्याच्या चौक्यांना निशाणा करण्यात आलं. ज्यामध्ये भारताकडूनही तोडीस तोड असं उत्तर देण्यात आलं. ज्यासाठी भारतीय सैन्यदलाकडून उत्तर पीर पंजाल डोंगररांगांमध्ये बऱ्याच काळापासून वापरात असणाऱ्या १५५ मीमी बोफोर्स तोफांचा वापर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्य म्हणजे बोफोर्स तोफांचा फार क्वचित वापर करण्यात येतो, ही बाबही तितकीच महत्त्वाची.