मुंबई : पाकिस्तानच्या 'बॉर्डर अॅक्शन टीम' म्हणजेच 'बॅट'च्या सैनिकांची कारवाई उधळून लावल्यानंतर आणि सैनिकांना या कारवाईदरम्यान ठार केल्यानंतर भारताकडून शेजारी राष्ट्राला त्यांच्या सैनिकांचे आणि दहशतवाद्यांचे मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यास सांगण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानने पांढरा ध्वज फडकावत हे मृतदेह परत न्यावेत असा संदेश भारताकडून देण्यात आला आहे.  पाकिस्तानकडून मात्र भारतीय सैन्याच्या या प्रस्तावाला अद्याप कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही. 


३१ जुलै आणि १ ऑगस़्टदरम्यान पाकिस्तानकडून जम्मू- काश्मीर येथे असणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या चौक्यांना निशाणा करण्यात आलं होतं. ज्यामध्ये शेजारी राष्ट्राकडून करण्यात आलेल्या घुसखोरीचं भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. या कारवाईत ४ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. तर, नियंत्रण रेषेनजीक सक्रीय असणाऱ्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यातही सैन्यदलाला यश आलं होतं. 



दरम्यान, भारताकडून हे मृतदेह ताब्यात घेतले जाऊ नयेत यासाठी पाकिस्तानकडून भारताच्या शोधमोहिमेत वारंवार सातत्याने करण्यात आलेल्या गोळीबारामुळे अडचणी आणण्यात येत होत्या. 


भारतीय सैन्यदलाकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर संबंधित परिसरात आणि नियंत्रण रेषेनजीक शेजारी राष्ट्राकडून वारंवार गोळीबार आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याचं सत्र सुरुच ठेवण्यात आलं आहे. ही एकंदर परिस्थिती पाहता काश्मीरच्या खोऱ्यात कोणतीही दहशतवादी कारवाई होऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त आणि सुरक्षेचे निकष यांवर संरक्षण दलांकडून भर देण्यात येत आहे.