भारत-चीन सीमेवरील तणावादरम्यानही भारतीय सैन्याने वाचवला चीनी नागरिकांचा जीव; अशी केली मदत
चीनच्या 3 नागरिकांना भारतीय सैन्यांने मदत करत, कठिण काळात त्यांचा जीव वाचवला आहे.
नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर LAC भारत आणि चीनमधील तणाव कायम असतानाही भारतीय सैन्याने (Indian Army) चीन्यांविरोधात माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. चीनच्या 3 नागरिकांना भारतीय सैन्यांने मदत करत, कठिण काळात त्यांचा जीव वाचवला आहे. चीनचे 3 नागरिक सिक्किमच्या पठारी, ( Sikkim's plateau area) बर्फाळ डोंगराळ भागात भरकटले होते. त्यांची भारतीय सैन्यांनी मदत करत, सुटका केली आहे.
चीनचे 3 नागरिक भरकटले असल्याची माहिती मिळताच भारतीय सैन्याने तात्काळ त्यांना रेस्क्यू करत त्यांचा जीव वाचवला. सैन्याच्या रेस्क्यू टीमकडून त्या नागरिकांची मेडिकल टेस्टही करण्यात आली. चीनी नागरिक बुधवारी 3 सप्टेंबर रोजी, 17 हजार 500 फूट उंचीवर रस्ता भरकटले होते.
भारतीय सैन्याच्या रेस्क्यू टीमने दिलेल्या माहितीनुसार, हिमाच्छादित-बर्फाळ डोंगराळ भागात भरकटलेल्या नागरिकांकडे खाण्यासाठी काही नव्हतं, तसंच पिण्याचं पाणी आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपडेदेखील नव्हते. एवढंच नाही तर त्या नागरिकांकडचा ऑक्सिजन स्टॉकही संपला होता. याच दरम्यान, भारतीय सैन्याने त्या नागरिकांची सुटका करत, त्यांना खाणं, पाणी, गरम कपडे देऊन त्यांच्यावर उपचारही केले.
त्यानंतर सैन्याने, त्या भरकटलेल्या 3 चीनी नागरिकांना योग्य मार्गावर नेऊन सोडलं. भारतीय सैन्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली असून काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.
सिक्किममध्ये उणे शून्य तापमानात, हाडं गोठवणाऱ्या थंडीत चीनच्या 3 नागरिकांची भारतीय सैन्याने मदत केली. त्यानंतर चीनी सैनिकांनी, भारतीय सैन्याचे आभार मानले आहेत. भारतीय सैन्यांची ही कामगिरी कौतुकास्पद असून त्यांच्या कार्याला सलाम आहे.