बंगळुरू : बंगळुरूतल्या भारतीय नौदल बेसमध्ये झालेल्या कार्यक्रमात भारतीय सेनेच्या जवानांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले... यावेळी जवानांनी एक दमदार 'वर्ल्ड रेकॉर्ड'ही आपल्या नावावर केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मोटारसायकलवर तब्बल ५८ जवान स्वार झाले... त्यांनी तब्बल सव्वा किलोमीटरपर्यंत असाच एकत्र प्रवास केला... हा जवानांचा 'स्टंट ऑफ द इअर' म्हणून ओळखला जातोय.


जवानांची बुलेटसवारी


आर्मी सर्व्हिस कॉर्प्सच्या ५८ जवानांचा हा रेकॉर्ड गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेलाय. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, जवानांनी ५०० सीसी रॉयल एनफील्ड बाईकवर ही कसरत करून दाखवलीय.


तिरंगी कपडे परिधान करणाऱ्या जवानांच्या या टीमचं नेतृत्व केलं मेजर बन्नी शर्मा यांनी... तर ५८ जवानांसहीत ही बाईक रामपाल यादव यांनी चालवली.


आहारावर ताबा


उल्लेखनीय म्हणजे, हा स्टंट करण्यासाठी ५८ जवानांची टीम गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत होती. या स्टंटसाठी जवान केवळ दिवसात काही बिस्किट आणि १०० मिली पानी घेत होते... त्यामुळे वजन बाईकनुसार, संतुलित ठेवलं जात होतं.


तिसऱ्यांदा मिळालं यश


दोन वेळा हा स्टंट करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. मात्र तिसऱ्या वेळी हा स्टंट यशस्वी ठरला आणि हा वर्ल्ड रेकॉर्डही ठरला.


गेल्या तीन दशकांत जगभरात हजारांच्यावर प्रदर्शन या टीमनं केलंय. तसंच या टीमच्या नावावर २० आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विक्रमांची नोंद झालीय.


तोडला आपलाच रेकॉर्ड


हा रेकॉर्ड करत जवानांनी आपलाच रेकॉर्ड तोडलाय. यापूर्वी या टीमनं एका बाईकवर तब्बल ५६ जवान स्वार होऊन एक रेकॉर्ड नोंदवला होता. या टीमनं १९८२ च्या आशियाई खेळांत पदार्पण केलं होतं.