जवान चंदू चव्हाण दोषी, तीन महिन्यांचा तुरुंगवास
सर्जिकल स्ट्राईकदरम्यान चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या आणि परत भारतात आणलेल्या जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दोषी ठरल्यानंतर तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेय.
नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईकदरम्यान चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या आणि परत भारतात आणलेल्या जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दोषी ठरल्यानंतर तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेय.
भारताने २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकदरम्यान अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने नियंत्रण रेषा ओलांडल्याप्रकरणी चंदोषी ठरविले आहे. ३७ राष्ट्रीय रायफल्समधील जवान चंदू चव्हाण हे नजरचुकीनं पाकिस्तानात पोहोचले होते.
२९ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांनी नियंत्रण रेषा ओलांडली होती. सूत्रांच्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नाराज होऊन चंदू चव्हाण पाकिस्तानात गेले होते. मात्र, यानंतर भारतानं सर्वोतोपरी प्रयत्न करत त्यांना २१ जानेवारीला पुन्हा मायदेशी सुखरुप आणले.
दरम्यान, मिळालेल्या या शिक्षेवर अंतिम स्वरुपात शिक्कामोर्तब होणं अद्याप बाकी आहे. तर दुसरीकडे या शिक्षेविरोधात चंदू चव्हाण अपीलदेखील करु शकतात.
भारतीय लष्कराने मध्य रात्री घुसून सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळे उद्ध्वस्त केलेत. यानंतर काही वेळाने चंदू चव्हाण यांनी नकळत नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले, अशी माहिती समोर आली. यावर भारतीय सैनिक पकडल्याची माहितीही पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली होती.
भारताने दबाव वाढवून पाकिस्तानमधून चंदू चव्हाण यांना २१ जानेवारीला मायदेशात आणण्यात यश मिळविले. केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा चालविला होता. यास यश आले आणि अमृतसर येथील वाघा बॉर्डर येथे चव्हाण यांना पाकिस्तानने भारताच्या स्वाधीन केले. यावेळी स्वत: डॉ. भामरे या वेळी उपस्थित होते.