नवी दिल्ली : यंदा ७०व्या प्रजासत्ताकदिनी महिला सशक्तीकरणाचे अतिशय सशक्त चित्र पाहायला मिळणार आहे. २६ जानेवारी रोजी राजपथवर होणाऱ्या संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला अधिकारी पुरूष सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करणार आहे. लष्करी सेवेत असणाऱ्या लेफ्टनंट भावना कस्तुरी देशाला हा गौरवशाली अनुभव देणार आहे. भारतीय लष्कर सेवेतील हा ऐतिहासिक क्षण असून भावना कस्तुरी पुरूष सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंडियन आर्मी सर्विस कॉर्प्स'च्या तुकडीत १४४ पुरूष जवान सामील असणार आहेत. लेफ्टनंट भावना कस्तुरी यांनी हा क्षण म्हणजे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. 'भारतीय सेनेत लैंगिक भेदभाव केला जात नाही. सेनेतील अधिकारी हा नेहमी अधिकारीच असतो. जबाबदारी आणि सेवेचा अधिकारही समानच असतो. आम्हाला भारतीय सेनेच्या ताकदीला मोठ्या प्लॅटफॉर्मवर आणण्याची मोठी संधी मिळाली असल्याची' प्रतिक्रिया भावना कस्तुरी यांनी दिलीय. 


भारतातील रुढी-परंपरांबाबत बोलताना त्यांनी भारतीय समाजातील जुन्या परंपरा दूर होत असल्याचं म्हटलंय. समाजात इतरही अनेक सकारात्मक बदल होत आहेत. केवळ भारतीय सेनेतील महिलाच नाही तर सामान्य जीवनातही महिला अद्भुत काम करत आहेत. महिला सतत काहीतरी नवीन, उत्तम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशातील सर्व महिलांनी आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी सतत परिश्रम करत राहीलं पाहिजे, आपली स्वप्न अर्ध्यावरच सोडून देऊ नये, असा संदेश भावना कस्तुरी यांनी देशवासियांना दिलाय.