नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणामुळे भारतातील वायूदल तसेच नौदलाच्या प्रमुखांना झेडप्लस सुरक्षा देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचे वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनुआ आणि नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांना झेडप्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येणार आहे. लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांना याआधीच ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे. वायुदलप्रमुख आणि नौदलप्रमुखांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. या दलांच्या प्रमुखांना त्यांच्या दलांच्या कमांडोंची सुरक्षा व्यवस्था असतेच. मात्र त्याभोवती आता झेडप्लस सिक्युरिटीचे कवचही उभारण्यात येणार आहे. 


आतपर्यंत देशात १७ व्हीआयपींना झेडप्लस सुरक्षा देण्यात आली आहे. नौदल आणि वायूदलाच्या प्रमुखांभोवती सध्या त्यांच्या दलांच्या कमांडोंची सुरक्षा व्यवस्था आहे. त्या कमांडो व्यवस्थेच्या भोवती आता झेडप्लस सुविधा उभारण्यात येणार आहे. पाकिस्तानशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. झेडप्लस सुरक्षा व्यवस्थेत ५५ रक्षक असतात. या ५५ रक्षकांमध्ये १० एनएसजी कमांडोंचा समावेश असतो. या एनएसजी कमांडोंच्या हाती हकलर आणि कोच एमपी ५ या अत्याधुनिक मशीनगन असतात. प्रत्येक सुरक्षा रक्षकाकडे अत्याधुनिक संपर्क यंत्रणा असते. प्रत्येक कमांडो मार्शल आर्टसमध्ये निष्णात असतो. अशाप्रकारची झेड प्लस सुरक्षा व्यवस्था असते. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.