Crime News: ऑस्ट्रेलियात एका भारतीय विद्यार्थिनीला जिवंत गाडण्यात आल्याचा प्रकार समोर आली आहे. नर्सिंग शिकणाऱ्या या तरुणीचं तिच्याच माजी प्रियकारने सूडापोटी मार्च 2021 मध्ये आधी अपहरण केलं आणि नंतर जमिनीत जिवंत गाडलं. तरुणीने नातं संपवल्याच्या रागात आरोपीने हे कृत्य केलं. जास्मीन कौर असं या पीडित तरुणीचं नाव आहे. अॅडलेड शहरात ती वास्तव्याला होता. आरोपी तारीकजोत सिंग याने बुधवारी कोर्टात आपला गुन्हा कबूल केला आहे. कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

5 मार्च 2021 रोजी आरोपी सिंगने जास्मीनचं तिच्या कार्यालयातून अपहरण केलं. त्याने आपल्या मित्राची कार आणलेली होती. जास्मीनचे हात पाय केबलने बांधून त्याने तिला डिक्कीत टाकलं आणि 650 किमी प्रवास केला. 


रिपोर्टनुसार, सिंगने जास्मीनच्या गळ्यावर वार केले होते. पण ते इतके खोल नव्हते की जास्मीन ठार होईल. यानंतर त्याने तिला दक्षिण ऑस्ट्रेलिया मधील दुर्गम फ्लिंडर्स रेंजमध्ये एका कबरीत जिवंत पुरलं.


सुप्रीम कोर्टात शिक्षा सुनावताना या घटनेचा हा धक्कादायक तपशील समोर आला. फिर्यादी कारमेन मॅटेओ यांनी यावेळी जास्मीनने एका दहशतीचा सामना केल्याचं म्हटलं. "तिने जिवंतपणीच मृत्यूचा दहशतवाद सोसला. या मृत्यूचं वर्णन श्वास रोखणं आणि माती गिळणं अशा शब्दांत केलं जाऊ शकतं", असं मॅटेओ यांनी म्हटल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.  6 मार्च रोजी तिचा मृत्यू झाला तेव्हा तिला तिच्या सभोवतालची जाणीव होती असं मॅटेओ यांनी सांगितलं. सूडापोटी ही हत्या करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. 


ABC News च्या वृत्तानुसार, फिर्यादीने सुप्रीम कोर्टात माहिती दिली की, जास्मीनने पोलीस ठाण्यात तारीकजोत सिंग आपला सतत पाठलाग करत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. याच्या महिन्याभरानंतर तिची हत्या करण्यात आली. 


कोर्टात शिक्षा सुनावली जात असताना जास्मीनची आईदेखील उपस्थित होती. माझ्या मुलीने तारीकजोतला हजारवेळा नकार दिल्यानंतरही तो तिचा पिच्छा सोडत नव्हता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचं वृत्त 9News ने दिलं आहे. 


तारीकजोतने कौरसाठी अनेक मेसेज लिहिले होते, जे त्याने कधी पाठवले नाहीत. पण त्यावरुन त्याच्या हत्येची आखणी समोर येत आहे. एका मेसेजमध्ये त्याने लिहिलं होतं की, "मी जिवंत आहे हे तुझं दुर्देव आहे. तू फक्त थांब...मी प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणार".


ब्रेकअप झाल्यानंतर तारीकजोत त्यातून बाहेर पडू शकला नव्हता. यामुळेच त्याने जास्मीनच्या हत्येचा कट आखला होता. जास्मीनच्या हत्येचा तपास सुरु झाला तेव्हा तारीकजोतने आरोप फेटाळले होते. तिने आत्महत्या केली आणि नंतर आपण मृतदेह दफन केला असा त्याचा दावा होता. पण कोर्टात खटला सुरु असताना त्याने गुन्ह्याची कबुली दिलं. तसंच पोलिसांनी जास्मीनला जिथे पुरलं होतं तिथे अधिकाऱ्यांना घेऊन गेला. पोलिसांना तिथे जास्मीनचे बूट, चष्मा आणि आयकार्ड सापडलं. तिथे केबलच्या वायरही पडल्या होत्या. 


अपहरणाच्या दिवशी दुपारी तारिकजोतने हार्डवेअर स्टोअरमधून हातमोजे, केबल आणि फावडा खरेदी केला होता. यावेळी तो सीसीटीव्ही कैद झाला होता. दरम्यान तारिकजोत सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्या वकिलांनी शिक्षा कमी करण्याची विनंती केली आहे.