मुंबई : भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे (NR) झोनने मदर्स डे निमित्त महिलांना आनंदाची बातमी दिली आहे. खरंतर रेल्वेने ही घोषणा केली आहे की, लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या मातांच्या सोयीसाठी बेबी सीट सुरू केली आहे. ही खरोखरंच मदर्स डे निमित्त एक चांगली भेट आहे. लखनौ मेलमधील कोच क्रमांक 194129/ B4, बर्थ क्रमांक 12 आणि 60 मध्ये बाळासह प्रवास करणाऱ्या महिलांसाठी हा बर्थ सुरू करण्यात आला आहे, ज्यामुळे मातांना त्यांच्या बाळासोबत प्रवास करता येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'या स्पेशल सीटला एक एक्ट्रा सीट देण्यात आली आहे, जी बिजागराला फोल्ड करण्यायोग्य आहे आणि स्टॉपरने सुरक्षित आहे,' असे या सीट चे वर्णन करताना NR च्या लखनौ विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाने ट्विट केले आहे.



 नागरिकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या उपक्रमाचे स्वागत केले आणि राष्ट्रीय वाहतूकदाराच्या प्रयत्नाचे कौतुक केले. मात्र, ऑनलाइन तिकीट बुक करताना ही तिकीट कशी बुक करता येईल किंवा त्यासाठी काय करावं लागेल, असा सवाल काहींनी केला आहे.


या नवीन उपक्रमाबद्दल बोलताना लखनौ विभागाचे डीआरएम सुरेश कुमार सप्रा यांनी सांगितले की, ''सध्या तरी ही सीट ऑनलाइन बुक करण्याची कोणतीही यंत्रणा नाही, परंतु लहान मुलासोबत प्रवास करणारे ऑन-बोर्ड तिकीट परीक्षकाला त्यांची जागा एखाद्या प्रवाशासोबत बदलण्याची विनंती करू शकतात.''


सुरेश कुमार सप्रा म्हणाले की, या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास भारतीय रेल्वे सर्व गाड्यांमध्ये बेबी बर्थचा पर्याय उपलब्ध केला जाईल.