Railway Rules: रेल्वेनं प्रवास करत असताना प्रवाशांसोबत असणारं सामानाचं ओझंही काही कमी नसतं. अनेकदा तर, हे सामानच इतकं होतं की आपण रेल्वेतून स्थानकावर उतरतेवेळी एखादी गोष्ट मागे राहून जाते. थोडक्यात आपण सामान विसरतो. रेल्वे स्थानकातून बाहेर आल्यानंतर किंवा मग रेल्वेनं फलाट ओलांडल्यानंतर आपल्या ही बाब निदर्शनास येते आणि मग एकच गोंधळ उडतो. अशा वेळी नेमकं काय करावं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वेनं प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी अनेक गोष्टींची आखणी केली. दर दिवशी कोट्यवधी प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवणारी ही रेल्वे तुमच्या हरवलेल्या सामानाचं नेमकं काय करते ठाऊक आहे? मुख्य म्हणजे एखादी गोष्ट रेल्वे प्रवासादरम्यान हरवली असता ती परत मिळणारच नाही असाच विचार तुम्ही करणार असाल, तर तसं नाहीये. तुम्ही हरवलेलं सामान सहजपणे परत मिळवू शकता. 


काय सांगतो रेल्वेचा नियम? 


निर्धारित नियमांनुसार कोणतीही रेल्वे तिच्या शेवटच्या स्थानकावर पोहोचल्यानंतर सुरक्षा दलांकडून (Railway Protection Force) काही प्रतिनिधी स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीनं रेल्वेगाडीची तपासणी करतात. कोणा प्रवाशाचं सामान रेल्वेमध्ये राहिलं नाहीये ना याचीही तपासणी होते आणि असं सामान मिळाल्यास ते सामान स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात जमा केलं जातं. 


रेल्वेगाडीमध्ये, रेल्वे स्थानकावर एखादी हरवलेली वस्तू मिळाल्यास किंवा एखादी बेवारस वस्तू मिळाल्यास ती स्टेशन मास्तरांकडे जमा करून एक पावती तयार केली जाते. या सामानाची रितसर नोंद होते. जिथं त्या वस्तूचं वजन, त्याची अंदाजे किंमत या आणि अशा तपशीलाची नोंदही असते. 


हेसुद्धा वाचा: अरे व्वा! सोन्याच्या दरात विक्रमी घट; चांदीचे दरही मोठ्या फरकानं कमी


हरवलेल्या कोणत्याही वस्तूसाठी जर एखाद्या व्यक्तीनं दावा केला, तर रेल्वे स्थानकावरील मुख्य अधिकारी या सामानाची आणि त्या व्यक्तीची खात्री पटवून घेतल्यानंतर ते त्यांना परत करतात. या प्रक्रियेत दावेदाराची संपूर्ण माहिती रेल्वेकडे नमूद करण्यात येते. 


जर, दावा करणाऱ्या व्यक्तीवर रेल्वे अधिकाऱ्यांना संशय आला, तर मात्र हे सामान प्रकरण डिवीजनल कमर्शियल सुपरिटेंडेंटपर्यंत जातं. इथं, पूर्ण तपासणीनंतरच सामान परत केलं जातं. सामान परत देतेवेळी भारतीय रेल्वे प्रवाशांकडून कोणतंही शुल्क आकारत नाही. सामान हरवल्यास सात दिवसांसाठी ते सामान स्टेशन मास्तरांकडे असतं. ज्यानंतर ते लॉस्ट प्रॉपर्टी ऑफिसमध्ये पाठवण्यात येतं.