Indian Railway : रेल्वेनं प्रवास करताना अनेकदा स्थानकांच्या नावांचं निरीक्षण करणं, त्याप्रती कुतूहलपूर्ण प्रश्न विचारणं ही अनेकांचीच सवय असते. भारतात अशी कैक रेल्वेस्थानकं आहेत ज्यांची नावं अतिशय सूचक असून त्या त्या ठिकाणचं महत्त्वं त्या एका नावात दडलेलं असतं. किंबहुना काही रेल्वे स्थानकांच्या नावांमध्ये काही सांकेतिक शब्दही असतात, ज्यामुळं हे शब्द स्थानकांच्या नावांमध्ये जोडलेले असतात. असाच एक शब्द म्हणजे, 'रोड'. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात काही अशी शहरं आहेत अशी रेल्वे स्थानकं आहेत जिथं त्या शहरांच्या नावात नसलं तरीही रेल्वे स्थानकांच्या नावाच मात्र 'रोड' हा शब्द जोडला जातो. उदाहरणार्थ, माटुंगा रोड, रांची रोड, करीरोड वगैरे वगैरे. 


रेल्वे स्थानकांमध्ये हा शब्द या कारणानं जोडलेला असतो जेणेकरून प्रवाशांना ठराविक माहिती देता येईल. ही माहिती म्हणजे रोड शब्द असणारी स्थानकं मूळ शहरापासून दूर असतात. म्हणजेच तुम्हाला रस्तेमार्गानं मूळ शहरापर्यंत पोहोचावं लागेल. कारण, रेल्वे तुम्हाला या ठिकाणपासून दूरवरच्या अंतरापर्यंतच्या ठिकाणी सोडते. 


रोड शब्दाचा उल्लेख असणारी रेल्वे स्थानकं मूळ शहरापासून साधारण 2 ते 3 किमी अंतरापासून 100 किमी पर्यंतच्या अंतरावर असतात. उदाहरणार्थ, वसई रोड हे रेल्वे स्थानक मूळ वसई शहरापासून 2 किमी अंतरावर आहे. कोडईकनल रोड हे स्थानक मूळ शहरापासून 79 किमी अंतरावर आहे. देशभरात अशी कैक रेल्वे स्थानकं आहेत जी मूळ शहरापासून ठराविक अंतरावर असून, तिथवर पोहोचण्यासाठी रस्तेमार्गाचा वापर केला जातो. 


हेसुद्धा वाचा : तब्बल 1700 वर्षांनंतर जगासमोर आला सँटाक्लॉजचा खरा चेहरा; तो कसा दिसायचा? अखेर गुंता सुटला... 


शहरापासून दूर का असतात ही रेल्वे स्थानकं? 


काही ठिकाणं रेल्वेमार्गान जोडताना एखादी मोठी अडचण आल्यामुळं ही रेल्वे स्थानकं शहरापासून दूर अंतरावर तयार करण्यात आली. उदाहरणार्थ माऊंट आबू पर्वतीय क्षेत्रामध्ये रेल्वेरुळांचं जाळं आणि तत्सम यंत्रणा राबवणं अतिशय आव्हानाचं ठरलं असतं. ज्यामुळं हे स्थानक या ठिकाणापासून 27 किमी दूरवर तयार करण्यात आलं.