Santa Claus: सँटाक्लॉज... म्हणा किंवा नाताळबाबा... एक गलेलठ्ठ वयोवृद्ध माणूस, त्याच्या चेहऱ्यावर कायमच दिसणारी आनंदी छटा, लालबुंद रंगाचे त्याचे लोकरी कपडे आणि पाठीवर असणारं भेटवस्तूंचं भलंमोठं पोतं... हे वर्णन काहीसं ओळखीचं वाटतंय का? चित्र असो किंवा एखादा सिनेमा. हा सँटाक्लॉज काहीसा अशाच रुपात सातत्यानं सर्वांच्या समोर आला. पण, त्याची खरी ओळख माहितीये का? प्रत्यक्षात ही एक काल्पनिक संकल्पना आहे की, खरंच असा कोणी माणूस आहे? असे प्रश्न पडणारे कमी नाहीत. याच सर्व प्रश्नांचं कमाल उत्तर नुकतंच संपूर्ण जगासमोर आलं आहे.
संशोधकांनी सांताक्लॉजच्या मागं दडलेल्या मायार येथील संत निकोलस यांचा एक चेहरा तयार केला असून, 1700 वर्षांपूर्वी हा चेहरा सर्वप्रथम सर्वांसमोर आला होता असं सांगितलं जात आहे. फार पूर्वी, ख्रिस्तधर्माच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये संत निकोलस नेमके कसे दिसायचे याची झलक आता सारं जग पाहू शकणार आहे. इतरांना भेटवस्तू देण्याच्या सवयीमुळं निकोलस यांना सँटाक्लॉज ही ओळख मिळाली, हळुहळू त्यांचं नाव नाताळ सणाशी जोडलं गेलं आणि या सँटाला सानथोर, सर्वांनीच कमालीचं प्रेम दिलं.
'मिरर'च्या वृत्तानुसार अभ्यासकांनी मायार येथील संत निकोलस यांच्या डोक्याच्या आराखड्याचा वापर करत फॉरेन्सिक पद्धतीनं नव्यानं त्यांचा चेहरा तयार केला. आश्चर्याचीच बाब म्हणजे जगभरात इतकी असंख्य वर्णनं असतानाही सँटाक्लॉज यांचं विशेश वर्णन अद्यापही उपलब्ध नाही. त्यामुळं आता संशोधकांच्या प्रयत्नांनंतर सँटा नेमका कसा दिसायचा हे सारं जग पाहू शकणार आहे.
सदर निरीक्षणाचे प्रमुख सिसेरो मोरेस यांच्या माहितीनुसार 1823 मधील कविता 'ए विजिट फ्रॉम सेंट निकोलस'मध्ये करण्यात आलेलं वर्णन आणि सध्या तयार करण्यात आलेला चेहरा यामध्ये बरंच साधर्म्य आहे. ज्याप्रमाणं या कवितेमध्ये दाट दाढी आणि चेहऱ्याची एकंदर घडण वर्णिली आहे, त्याचप्रमाणं हा तयार चेहरा सँटाक्लॉजशी मिळताजुळता आहे.
मोरेस यांच्या माहितीनुसार त्यांच्या टीमनं 1950 मध्ये लुइगी मार्टिनो यांनी एकत्रित केलेल्या माहितीचा संदर्भ घेत त्यांच्या डोक्याची आखणी 3D पद्धतीनं केली यानंतर सांख्यिकीय (Estatics Extension) तर्कांच्या मदतीनं त्यांनी या चेहऱ्याची घडण निश्चित केली आणि जगासमोर आला सँटाक्लॉज.