मुंबई : Indian Railways : कोरोनापूर्वीच्या 1700 ट्रेन नियमितपणे चालवल्या जाणार आहेत. कोरोना काळातील विशेष रेल्वे, विशेष दर बंद होणार आहेत. रेल्वेचे तिकीट दर पूर्वीप्रमाणेच आकारण्यात येणार आहे. कोरोना नियंत्रणात आल्याने रेल्वे मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरातील कोरोनाचा  (Coronavirus) उद्रेक कमी झाला. तसेच कोरोना रुग्णांत घट झाल्यानंतर, सरकारने संपूर्ण देशभरात सामान्य रेल्वे सेवा पूर्णपणे पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे कोरोना येण्यापूर्वी देशात धावणाऱ्या 1700 एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्या पुन्हा धावू लागतील. यासाठी सरकारने  CRISला सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करण्यास सांगितले आहे. (Indian Railways: Railway travel resumes as before, special train of Corona period canceled)


विशेष गाड्यांचे युग संपले  


रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर कोविड स्पेशल, एक्सप्रेस स्पेशल किंवा हॉलिडे स्पेशल म्हणून ज्या गाड्या चालवल्या जात होत्या. त्यांची सेवा आता नेहमीच्या गाड्यांसारखी असेल. म्हणजेच या सर्व गाड्या त्यांच्या जुन्या नियमित क्रमांकासह आणि वेळेनुसार रुळांवर धावतील. त्यामुळे कोरोनापूर्वीचे रेल्वे भाडे पुन्हा लागू होणार आहे. मंत्रालयाच्या या आदेशानंतर गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या सुमारे 1700 सुपरफास्ट  (Mail Express) आणि एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र, या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांसारख्या कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.


पूर्वीप्रमाणे भाडे आकारणार


रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) स्पष्ट केले की, ज्यांनी आगाऊ तिकीट बुक केले होते. त्यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही आणि कोणतेही पैसे परत केले जाणार नाहीत. म्हणजेच ज्यांनी आगाऊ तिकीट बुक केले आहे, त्यांच्याकडून भाड्याचा फरकही घेतला जाणार नाही किंवा त्यांना कोणताही परतावा दिला जाणार नाही. अशा प्रवाशांना त्यांच्या पूर्वीच्या तिकिटाच्या आधारेच रेल्वेमधून प्रवास करता येणार आहे.


गतवर्षी मार्चमध्ये रेल्वेसेवा बंद 


गतवर्षी कोरोना महामारी (Coronavirus) सुरू झाल्यानंतर भारतीय रेल्वेने 25 मार्च 2020 पासून देशभरातील प्रवासी रेल्वे सेवा बंद केली होती. नंतर बाधितांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी श्रमिक स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या. या गाड्या देशाच्या विविध भागांमध्ये नवीन क्रमांक, नवीन वेळा आणि नवीन भाडे घेऊन धावण्यात आल्या. मात्र, गाड्यांची वारंवारता कमी असल्याने लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यानंतर सरकारने परिस्थितीचा आढावा घेतला आणि सामान्य रेल्वे सेवा पूर्ववत करण्याची घोषणा केली.