गेल्या २४ तासात भारतात ९७,८९४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; ११३२ जणांचा मृत्यू
भारताने कोरोना रुग्ण संख्येत 51 लाखांचा टप्पा पार केला आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. भारताने कोरोना रुग्ण संख्येत 51 लाखांचा टप्पा पार केला आहे. दिवसागणिक वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या भारतासाठी मोठी चिंतेची बाब ठरत आहे. गेल्या 24 तासात देशात 97 हजार 894 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 1132 जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 51 लाख 18 हजार 254 इतकी झाली आहे. त्यापैकी 40 लाख 25 हजार 80 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
सध्या देशात 10 लाख 9 हजार 976 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत देशात 83 हजार 198 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबरपर्यंत देशात 6,05,65,728 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर बुधवारी एका दिवसात 11,36,613 इतक्या चाचण्यात घेण्यात आल्या आहेत.
देशातील कोरोना रुग्णांची सर्वाधिक आकडेवारी महाराष्ट्र राज्यात आहे. बुधावारी महाराष्ट्रात 23,363 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकट्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाख 21 हजार 221 इतका झाला आहे. त्यापैकी 7 लाख 92 हजार 832 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात 2 लाख 97 हजार 125 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 30 हजार 883 जण दगावले आहेत.