Covid-19 : गेल्या २४ तासांत देशात ७८,७६१ नव्या रुग्णांची नोंद
कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या ३५ लाखांवर पोहोचली आहे.
मुंबई : कोरोना व्हायरचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. ही साखळी तोडण्यासाठी अनेक स्तरांमधून विविध उपाय राबवले जात आहेत. तरी देखील कोरोनाचा उद्रेक थांबत नसल्याचं चित्र संपूर्ण जगासमोर आहे. गेल्या काही महिन्यांपासून फैलत असलेल्या कोरोना विषाणूमुळे देशाची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे. सर्वच देश या महामारीमुळे आलेल्या संकटांना तोंड देत आहेत.
भारतात कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या रुग्णांनी ३५ लाखांचा आकडा ओलांडला आहे. देशात ३५ लाख ४२ हजार ७३४ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ७८ हजार ७६१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ९४८ रुग्णांनी या धोकादायक व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहे.
सध्या देशात ७ लाख ६५ हजार ३०२ रुग्णांवर उपचार असून दिलासा देणारी बाब म्हणजे २७ लाख १३ हजार ९३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. जगभरातील करोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देशात आतापर्यंत ४,१४,६१,६३६ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर शुक्रवारी देशात १० लाख ५५ हजार ०२७ चाचण्या करण्याात आल्या आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.