जयपूर: देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली असली तरी काँग्रेसच्या राजवटीमुळे जगभरात भारत अजूनही गारुड्यांचा देश म्हणूनच ओळखला जातो, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते शुक्रवारी राजस्थानच्या बिकानेर येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, एकवेळ अशी होती की, जेव्हा काँग्रेस परदेशी पाहुण्यांना गारुड्यांचे खेळ दाखवून रिझवत असे. त्यामुळे संपूर्ण जगात भारताची ओळख गारुड्यांचे खेळ आणि जादुगारांचा देश अशीच झाली होती. आज इतक्या दशकांनंतरही भारताकडे त्याच दृष्टीकोनातून पाहिले जाते, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदी यांच्या या विधानाचा रोख काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी रायबरेली मतदरासंघात प्रचार करत असताना प्रियंका यांनी एका गारूड्याशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी सापही हातात धरला होता. सोशल मीडियावर प्रियंका यांचा हा व्हीडिओ व्हायरल झाला होता. मात्र, काही जणांनी यावर आक्षेप नोंदवला होता. एवढेच नव्हे तर याप्रकरणी वन्यजीव महामंडळाचे अधिकारी जयप्रकाश सक्सेना यांनी रायबरेली जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.



याच मुद्द्यावरून आजच्या सभेत मोदींनी प्रियंका यांना लक्ष्य केले. यावेळी पंतप्रधानांनी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा दाखल देत म्हटले की, देश आता सापांच्या नव्हे तर 'माऊस'च्या (उंदीर) सहाय्याने प्रगती करत आहे. मात्र, काही जणांना या गोष्टीचा पुरता विसर पडलेला आहे. मात्र, हा देश आता गारुड्यांचा राहिलेला नाही. ते आता माऊस घेऊन प्रगती करत असल्याचे मोदींनी सांगितले.