इंडिगो एअरलाईन्सवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
इंडिगो एअरलाईन्सवर मंगळवारी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय चलन स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला.
नवी दिल्ली : इंडिगो एअरलाईन्सवर मंगळवारी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय चलन स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला.
इंडिगोवर १२४ अ कलमातंर्गत गुन्हा
इंडिगोवर १२४ अ कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिल्लीचे प्रवासी प्रमोद कुमार जैन यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जैन यांनी दिल्लीच्या सरोजिनी नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली.
जेवणाचे पैसे द्यायचे होते, मात्र
विमान प्रवासादरम्यान प्रमोद जैन यांनी जेवण मागवले होते. जैन यांना जेवणाचे पैसे द्यायचे होते, मात्र भारतीय चलन इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी नाकारले, असा दावा जैन यांनी केला आहे.
बंगळुरू-दुबई विमान प्रवासातील किस्सा
इंडिगो एअरलाईन्सच्या बंगळुरू-दुबई विमानाने प्रमोद जैन हे प्रवास करत असताना हा प्रकार घडला. जैन यांच्या तिकीटाच्या रकमेत जेवणाचा समावेश नव्हता. त्यामुळे जैन यांनी विमानात स्वतंत्रपणे जेवण मागवले. त्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना पैसेही देऊ केले.
रक्कम भारतीय चलनात होती
मात्र, इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी जैन यांना जेवण देण्यास नकार दिला कारण ही रक्कम भारतीय चलनात होती . मात्र, आम्हाला विमानप्रवासादरम्यान केवळ परकीय चलनाच्या रूपात रक्कम स्वीकारण्याचे आदेश असल्याचे इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
हवाई प्रवासासाठी आखलेल्या नियमांनुसार
इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी नियमांचा दाखला देत भारतीय चलन स्वीकारण्यास नकार दिला. परंतु, हवाई प्रवासासाठी आखून देण्यात आलेल्या नियमांनुसार ज्या देशातून विमानाने उड्डाण केले असेल त्या देशातील चलन विमानातील व्यवहारासांठी वापरले जाऊ शकते, असे प्रमोद जैन यांनी म्हटले आहे.