नवी दिल्ली : निवडणुकीत गाजलेल्या अनेक वादग्रस्त मुद्द्यांपैकी एक म्हणजे सावरकरांना भारतरत्न देण्याचा... राहुल गांधींनी याला कडाडून विरोध केला असला तरी खुद्द इंदिरा गांधीच सावरकरांना 'देशभक्त' मानत असल्याचा पुरावा 'झी २४ तास'च्या हाती लागलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा या निवडणुकीत चांगलाच गाजतोय. भाजपानं त्यांच्या जाहीरनाम्यात याचं आश्वासन दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी टीकेची झोड उठवली. खुद्द पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सावरकरांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र त्यांच्या आजी, इंदिरा गांधींनी सावरकरांच्या स्मरणार्थ 'पोस्टल स्टॅम्प' काढल्याचं खुद्द मनमोहन सिंग यांनीच सांगितलं आणि राहुल गांधींच्या विरोधातली हवा काढली.


आता तर १९६६ साली इंदिरा गांधींनी लिहिलेलं एक पत्र समोर आलंय. यात सावरकरांना राष्ट्रभक्तच नव्हे, तर 'सन ऑफ सॉईल' म्हणजे भारतमातेचे सुपुत्र संबोधण्यात आलंय. 


इंदिरा गांधी यांचं पत्र

याखेरीस माजी उपराष्ट्रपती के. आर. नारायणन, महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार, तत्कालिन पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव, बिहारचे तत्कालिन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, हरियाणाचे तत्कालिन मुख्यमंत्री भजनलाल यांची काही पत्रही उजेडात आली आहेत. यामध्येही सावरकरांचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख आढळून आलाय. राहुल गांधींनी आधी काँग्रेस नेत्यांकडून इतिहास जाणून घ्यायला हवा होता, अशा शब्दांत सावरकरांचे नातू रंजीत यांनी टोला लगावलाय.


या नव्या कागदपत्रांमुळे विरोधी पक्षांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालीय. सावरकरांना विरोध कायम ठेवायचा तर इंदिरा गांधींसह अनेक बड्या नेत्यांना खोटं ठरवावं लागेल किंवा मग राहुल गांधींना तरी विरोध करावा लागेल.