Pakistan Crisis​ : पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय गदारोळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 30 रुपयांनी (पाकिस्तानी रुपया) वाढ केली आहे. मध्यरात्रीपासून नवा दर लागू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वस्तूंवरील सबसिडी बंद करण्याचा आग्रह धरल्यानंतर पाकिस्तानच्या अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल यांनी पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ करण्याची घोषणा केली. यानुसार 27 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 30 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


नवा दर लागू झाल्यानंतर इस्लामाबादमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 179.86 रुपये आणि डिझेलची किंमत 174.15 रुपये झाली आहे. याशिवाय रॉकेलच्या दरातही 30 रुपयांनी वाढ करण्यात आली असून,आता त्याची किंमत 155.56 रुपयांवर पोहोचली आहे.


माजी पंतप्रधान इम्रान खान यांची टीका
पाकिस्तानमध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या वाढीनंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सध्याच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी अनेक ट्विट करत पाकिस्तान सरकारवर निशाणा साधत भारताचं कौतुक केलं आहे. इंधनाच्या किमतीत सतत होणाऱ्या वाढीबद्दल खान यांनी नाराजी व्यक्त केली असून पाकिस्तानच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वाढ असल्याचं म्हटलं आहे. अक्षम आणि असंवेदनशील सरकारने रशियाकडून 30 टक्के स्वस्त तेलाचा आमचा करार पुढे नेला नाही अशी टीकाही इम्रान खान यांनी केली आहे. 


रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या भारताच्या रणनीतीचे इम्रान खान यांनी कौतुक केलं आहे. भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून इंधनाच्या किमती प्रति लिटर 25 रुपयांनी कमी केल्या असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.


अर्थमंत्री इस्माईल यांनी केली घोषणा 
सरकारने पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती प्रति लिटर 30 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी गुरुवारी केली .अर्थमंत्र्यांनी इस्लामाबाद इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.


सत्तापरिवर्तनानंतर पाकिस्तानमध्ये परिस्थिती आणखी बिघडली
पाकिस्तानात सत्ताबदल झाल्यानंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडली आहे. इम्रान खानच्या स्वातंत्र्ययात्रेला रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर तैनात केले. आंदोलक आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमकही झाली. इम्रानच्या समर्थकांनी मेट्रो स्टेशनही जाळले. अशातच पाकिस्तानची आर्थिक स्थितीही ढासळत चालली आहे.