महागाईचा झटका! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ, व्यावसायिक सिलिंडर 75 रुपयांनी महागला
LPG Price Hike : 1 सप्टेंबरची सुरुवात महागाईच्या झटक्याने सुरुवात झाली आहे.
मुंबई : LPG Price Hike : 1 सप्टेंबरची सुरुवात महागाईच्या झटक्याने सुरुवात झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एवढेच नाही तर 19 किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीही वाढल्या आहेत, त्याची किंमत प्रति सिलेंडर 75 रुपयांनी वाढवली आहे.
एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महाग
या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलो एलपीजी ( LPG) सिलिंडर आता 884.5 रुपये झाला आहे. तर यापूर्वी ते 859.50 रुपये मिळत होता. यापूर्वी 17 ऑगस्ट रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या आधी 1 जुलै रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
मुंबईतही 14.2 किलो एलपीजी सिलिंडरचा दर आता 884.5 रुपये आहे, तर आतापर्यंत 859.50 रुपये होता. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरचा दर 886 रुपयांवरून 911 रुपये प्रति सिलिंडर झाला आहे. चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी तुम्हाला आजपासून 900.50 रुपये मोजावे लागतील, जे कालपर्यंत 875.50 रुपये होते. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी तुम्हाला 897.5 रुपये मोजावे लागतील. अहमदाबाद, गुजरातमध्ये एलपीजीसाठी 866.50 द्यावे लागतील. आतापर्यंत हा सिलिंडर भोपाळमध्ये 840.50 रुपयांना उपलब्ध होता, जो आजपासून 865.50 रुपये झाला आहे.
14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ
शहर जुना दर नवीन दर
दिल्ली 859.50 884.5
मुंबई 859.50 884.5
कोलकाता 886 911
चेन्नई 875.50 900.5
लखनऊ 897.5 922.5
अहमदाबाद 866.50 891.5
भोपाल 840.50 890.5
एलपीजी सिलिंडर या वर्षी 190.50 रुपयांनी महाग
2021 या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढवून 719 रुपये प्रति सिलिंडर करण्यात आली. 15 फेब्रुवारीला किंमत वाढवून 769 रुपये करण्यात आली. यानंतर, 25 फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलिंडरची किंमत 794 रुपये करण्यात आली. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 819 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. एप्रिलच्या सुरुवातीला 10 रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत 809 रुपयांवर गेली होती. एका वर्षात एलपीजी सिलेंडरच्या किमती 190.50 रुपयांनी वाढल्या आहेत. तर डिसेंबरपासून आतापर्यंत सिलिंडरच्या किंमतीत सुमारे 300 रुपयांनी वाढ झाली आहे.
व्यावसायिक सिलिंडरही झाले महाग
एलपीजी सिलिंडर व्यतिरिक्त, व्यावसायिक गॅस सिलिंडर देखील 75 रुपयांनी महाग झाले आहे. 17 ऑगस्ट रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतही 68 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता दिल्लीत 1618 रुपयांऐवजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी तुम्हाला 1693 रुपये मोजावे लागतील.