शत्रूचा अचूक अंदाज घेणाऱ्या INS Kavaratti नं वाढलं नौदलाचं बळ
सागरी संरक्षणासाठी सज्ज असणाऱ्या...
नवी दिल्ली : प्रोजेक्ट २८ अंतर्गत साकारण्यात आलेली संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस कवरत्ती INS Kavaratti ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यास समाविष्ट होत आहे. या युद्धनौकेमुळं नौदलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ होणार आहे. भारतीय सैन्यदल प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या हस्ते ही युद्धनौका देशसेवेत सुपूर्द करण्यात येत आहे.
नौदल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या युद्धनौकेमध्ये अत्याधुनिक शस्त्र प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. शिवाय यामध्ये असे सेंसरही लावण्यात आले आहेत जे पाणबुडीच्या ठिकाणाचा ठाव घेत त्यांचा मागोवा घेण्यासाठी वापरले जाणार आहेत.
भारतीय सागरी संरक्षणासाठी सज्ज असणाऱ्या नौदलाच्या सामर्थ्यात या युद्धनौकेमुळं दुपटीनं वाढ होईल असं म्हणायला हरकत नाही. याआधी याच मालिकेतील तीन युद्धनौका भारतीय नौदलातील ईस्टर्न फ्लीटमध्ये कार्यान्वित आहेत.
सेल्फ डिफेन्स कार्यप्रणालीनं परिपूर्ण असणारी ही युद्धनौका लांब पल्ल्याच्या मोहिमेत मोठी मदतीची ठरणार आहे. मुख्य म्हणजे यातील जवळपास ९० टक्के यंत्रणा ही पूर्णपणे भारतीय आहे.