वंदे भारतमध्ये प्रवाशांच्या जेवणात अळ्या, कर्मचारी म्हणे हे तर जिरं...; रेल्वेने हे उत्तर ऐकलात उचललं मोठं पाऊल
Vande Bharat Insect Food News: वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला जेवणात किडे सापडल्याची घटना घडली आहे. त्यावर आता रेल्वेने एक स्पष्टीकरण दिलं आहे.
Vande Bharat Insect Food News: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाला जेवणात कीडे सापडल्याची घटना घडली होती. यानंतर रेल्वेने एक स्पष्टीकरण जारी केले आहे. दक्षिण रेल्वेने प्रवाशांची माफी मागून जेवण पुरवणाऱ्या कंपनीविरोधात कठोर कारवाई केली आहे. कंपनीवर 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वृंदावन फुड प्रोडक्ट्सकडून जेवण पुरवण्यात आलं होतं. मात्र, जेवणात किडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळं प्रवाशांच्या सुरक्षितेतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरुगन नावाचा प्रवासी तिरुनेलवेली-चेन्नई एग्मोर वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करत होता. ट्रेन नंबर 20666 असं ट्रेनचं नाव आहे. मुरुगनने मुदरैयेथून ट्रेन रवाना झाल्यानंतर काही वेळातच त्याने जेवणाबाबत तक्रार नोंदवली. चौकशी केल्यानंतर लक्षात आले की जेवण तिरुनेलवेली बेस किचनमधून पुरवण्यात आलं होतं. ज्याचे मॅनेजमेंट वृंदावन फुड प्रोडक्ट्सकडून सांभाळण्यात येते. रेल्वेने म्हटलं आहे की, निष्काळजीपणामुळं वृंदावन फुड प्रोडक्टवर कारवाई करण्यात आली आहे.
प्रवाशाने सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. आश्चर्य म्हणजे, सांबारमध्ये किडा आढळल्यानंतर कॅटरिंग स्टाफने ते किडे नसून जिरं आहे, असं सांगून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र सांबारात तरंगणाऱ्या किड्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सने रेल्वेकडून पुरवल्या जाणाऱ्या कॅटरिंग सुविधेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
ANIने दिलेल्या माहितीनुसार, डिंडीगुल स्थानकावर मुरुगनला दुसरं जेवण देण्यात आले. मात्र त्याने खाण्यास नकार दिला. ज्या पॅकेटमध्ये किडा आढळला ते तापसणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र तपासणीत समोर आले की, किडा त्या कंटेनरच्या झाकणावर अडकला होता. ज्यातून सांबार वाढण्यात आलं होतं. जिथे जेवणाचे पॅकेट ठेवण्यात आले होते तिथेदेखील चौकशी करण्यात आली. मात्र तिथे कोणतीच समस्या आढळून आली नाही.
जेवणात किडे आढळल्याने काँग्रेस खासदाराने उपस्थित केले सवाल
रेल्वेतील जेवणात किडे आढळल्यानंतर काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी व्हिडिओ शेअर करत वंदे भारत ट्रेनच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मणिकम टागोर यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना टॅग करत म्हटलं आहे की, तिरुनेलवेली चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये पुरवल्या जाणाऱ्या जेवणात जिवंत किडे सापडले आहेत. प्रवाशांनी रेल्वेची स्वच्छता आणि IRCTCच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी आणि प्रिमियम ट्रेनमध्ये खाद्य सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे.