लखनऊ: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हीडिओमुळे प्रकाशझोतात आलेले पोलीस निरीक्षक मनोज कुमार शुक्रवारी गुन्हेगारांशी झालेल्या चकमकीत जखमी झाले आहेत. संभळ जिल्ह्यात हा प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी दोन गुन्हेगारांना पकडण्यासाठी सापळा लावला होता. मात्र, या गुन्हेगारांना बाईकवरून पळ काढला. यावेळी त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये मनोज कुमार जखमी झाले. तर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक गुन्हेगार जखमी झाला असून त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. मनोज कुमार यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती पोलीस अधिक्षक यमुना प्रसाद यांनी दिली.





१२ ऑक्टोबरला उत्तर प्रदेशच्या असमोली येथे पोलीस एका गुंडाला पकडण्यासाठी गेले होते. या पोलीस पथकात मनोज कुमार यांचाही समावेश होता. पोलीस मागे लागल्यानंतर हा गुंड जवळच्या ऊसाच्या शेतामध्ये लपला. त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबारही केला.प्रत्युत्तरादाखल गुंडावर गोळीबार करताना एका पोलीस अधिकाऱ्याची रिव्हॉल्व्हर खराब झाली. तेव्हा मनोज कुमार यांनी प्रसंगावधान राखत तोंडाने गोळी झाडल्याचा ‘ठाय… ठाय…’ असा आवाज काढला. जेणेकरून गुंड घाबरेल, असा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, यामुळे उत्तर प्रदेशचे पोलीस खाते सोशल मीडियावर थट्टेचा विषय झाले होते. मनोज कुमार यांचा तोंडाने ‘ठाय… ठाय…’आवाज काढतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.