`टीव्ही अॅंकरच्या अपमानास्पद प्रश्नामुळे सर्जिकल स्ट्राईक केला`
माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल मोठा खुलासा केला आहे.
पणजी : माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल मोठा खुलासा केला आहे. टीव्ही अॅंकरनं राज्यवर्धन राठोड यांना विचारलेल्या अपमानास्पद प्रश्नामुळे सर्जिकल स्ट्राईक केल्याचं मनोहर पर्रिकर म्हणाले आहेत.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राईक हा १५ महिने आधीपासून प्लॅन केला होता अशी प्रतिक्रिया पर्रिकर यांनी दिली. ४ जून २०१५ ला मणीपूरच्या चाण्डेल जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. २०० दहशतवाद्यांच्या एका टोळीनं हे कृत्य करणं भारतीय लष्करासाठी अपमानास्पद होतं. यानंतर लष्करानं ८ जूनला भारत-म्यानमार बॉर्डरवरच्या त्या ७० ते ८० दहशतवाद्यांचा खात्मा केला, असं वक्तव्य पर्रिकर यांनी केलं.
म्यानमार बॉर्डरवरचं हे ऑपरेशन यशस्वी झालं पण यावरून एका टीव्ही अॅंकरनं केंद्रीय मंत्री आणि माजी लष्कराधिकारी राज्यवर्धन राठोड यांना अपमानास्पद प्रश्न विचारला. भारताच्या पश्चिम बॉर्डरवर असा हल्ला करण्याची हिंमत तुमच्यात आहे का असा सवाल टीव्ही अँकरनं राठोड यांना विचारला आणि त्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याचं ठरलं, असं पर्रिकर म्हणाले.
९ जून २०१५ ला विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचं उत्तर २९ सप्टेंबर २०१६ ला मिळालं. हा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या प्लॅनला सुरुवात झाल्याचा खुलासा पर्रिकर यांनी केला.