मुंबई : तुम्ही रेल्वेनं लांब पल्ल्याचा प्रवास करणार असाल तर आपल्या ट्रेनच्या कोचवर रिझर्व्हेशन चार्ट पाहायला जाऊ नका... कारण, आता रेल्वे कोचवर हे चार्ट लावणंच बंद करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय... त्यासाठी त्यांनी पर्यायी सुविधांचा वापर करण्यात नागरिकांना आवाहन केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता नवी दिल्ली, मुंबई सेंट्रल, मुंबई सीएसटी, चेन्नई सेंट्रल, कोलकाता हावडा जंक्शन आणि कोलकाता शियालदाह जंक्शनहून निघणाऱ्या ट्रेनच्या कोचेसवर चार्ट लावण्यात येणार नाही. रिझर्वेशन चार्ट नसेल तर ज्यांचं रिझर्वेशन वेटिंगवर किंवा आरएसीमध्ये झालंय आणि शेवटच्या क्षणी त्यांना आपल्या सीटबद्दल माहिती मिळते, अशा नागरिकांना याचा त्रास होणार आहे. अशावेळी तुम्ही सरळ जाऊन टीसीकडे तुमच्या सीटबद्दल माहिती विचारू शकता.


याशिवाय ऑनलाईनही तुम्ही तुमच्या सीटबद्दल खातरजमा करू शकाल. IRCTC वर जाऊन तुम्ही PNR नंबर टाकून माहिती घेऊ शकता. तसंच  indiarailinfo.com वर जाऊन पीएनआर चेक करू शकता... किंवा railyatri.in, checkpnrstatusirctc.in, trainspnrstatus.com आणि confirmtkt.com यावेबसाईटचाही वापर करू शकता.


तसंच रेल्वेची हेल्पलाईन १३९ वर कॉल करूनही आपल्या पीएनआर स्टेटसची तपासणी तुम्ही करू शकाल. आपल्या मोबाईलच्या मॅसेज बॉक्समध्ये जाऊन PNR लिहून एक स्पेस दिल्यानंतर आपला PNR क्रमांक टाका आणि हा मॅसेज ५८८८ / १३९ / ५६७६७४७ / ५७८८६ या क्रमांकावर पाठवा. यानंतर तुम्हाला तुमच्या पीएनआरची माहिती पाठवली जाईल.