मुंबई : तुमचा पगार ३० तारखेला तुमच्या बँकेत जमा होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सार्वजनिक बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ३० मेपासून दोन दिवसांचा संप पुकारला आहे. अर्थातच याचा परिणाम तुमच्या पगारावर पडू शकतो. बँक युनियन्सकडून ३० मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून आंदोलनाची घोषणा करण्यात आलीय. दोन दिवसांचं हे आंदोलन १ जून २०१८ रोजी सकाळी ६ वाजता संपण्याची शक्यता आहे. अशा वेळी महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत बँक कर्मचारी आंदोलनात सहभागी होत असल्यानं तुमचा पगार तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी विलंब होऊ शकतो. 


ऑनलाईन सुविधेचा वापर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आंदोलनामुळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनवर काहीही फरक पडणार नाही... मात्र, रोख रक्कमेवर याचा जरूर परिणाम दिसू शकेल. दरम्यान, यावर उपाययोजना म्हणून बँकांनी एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी कोणतीही अडचण येणार नसल्याचं आश्वासन दिलंय. त्यामुळे हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी एटीएममध्ये योग्य ती रक्कम उपलब्ध असेल. 


एटीएमवर गर्दी


वेतन दरवाढीच्या कारणावरून सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारलाय. देशभरातील तब्बल १० लाखांपेक्षा अधिक कर्मचारी ३० आणि  ३१ मे असे सलग दोन दिवस संपावर जात आहेत. या संपाचा फटका बँक ग्राहकांना बसणार आहे. दरम्यान, दोन दिवस बॅंक बंद राहणार असल्याने पैशाची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढून  जवळ ठेवण्यावर अनेकांचा भर दिसून येत आहे. त्यामुळे एटीएमवर काही ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे.


बँक कर्मचाऱ्यांचा वेतवाढीचा करार ३१ ऑक्टोबर २०१७ ला संपलाय. त्यामुळे १ नोव्हेंबर २०१७ पासून नवीन वेतनवाढ होणं अपेक्षित आहे. मात्र ही वेतनवाढ न झाल्याने कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. या संपाचा फटका बँक ग्राहकांना बसणार आहे.