इस्रो लॉंच करणार 50 गुप्तचर सॅटेलाईट, पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार लक्ष?
ISRO launching 50 Spy Satellites: या उपग्रहांच्या माध्यमातून शत्रूंच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवता येईल, असे इस्रो प्रमुखांनी सांगितले.
ISRO launching 50 Spy Satellites: 2023 मध्ये झालेल्या चांद्रयान 3 आणि आदित्य एल 1 च्या यशस्वी मोहिमेनंतर इस्त्रोकडून अपेक्षा वाढल्या आहेत. इस्रो दरवेळेस नवीन झेप घेत आहेत. यामुळे भारताचा झेंडा सातासमुद्रापार रोवला गेला आहे. अंतराळ क्षेत्रात अशीच एक उंच भरारी इस्रो 2024 मध्ये घेणार आहे. गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी भारत पुढील पाच वर्षांत 50 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. यात सैनिकांच्या हालचालींचा मागोवा घेण्याची आणि हजारो किलोमीटर क्षेत्राचे फोटो घेण्याची क्षमता असेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
या उपग्रहांच्या माध्यमातून शत्रूंच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवता येईल, असे इस्रो प्रमुखांनी सांगितले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बेच्या वार्षिक टेक फेस्ट कार्यक्रमात सोमनाथ बोलत होते. आपल्याकडे आतापर्यंत 10 पट जास्त उपग्रह असायला हवे होते. सध्या आपल्याकडे एवढ्या प्रमाणात उपग्रह नाहीत जे भारताची मजबूत राष्ट्र बनण्याची आकांक्षा पूर्ण करू शकतील, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
बदलत्या काळानुसार उपग्रहाची क्षमता सुधारणे, डेटाचे विश्लेषण करण्यासाठी AI-संबंधित आणि डेटा-विश्लेषण पद्धती आणणे, डेटा डाउनलोड कमी करणे आणि फक्त आवश्यक माहिती मिळवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शेजारी देशांवर लक्ष ठेवण्यास मदत
इस्रो प्रमुख म्हणाले की, अंतराळयान कोणत्याही देशाच्या सीमा आणि शेजारी देशांवर लक्ष ठेवू शकते. हे सर्व उपग्रहावरून पाहता येईल. यामुळे आपल्या क्षमतेत वाढ होणार आहे. आपली उद्दीष्ट साध्य करण्यासाठी हे उपग्रह प्रक्षेपित करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपग्रह कॉन्फिगर
आजूबाजूला काय चालले आहे हे समजून घेण्याची क्षमता ज्या देशात आहे, तो देश अधिक शक्तिशाली असतो. सध्या अनेक गुप्तचर उपग्रहांची रचना आणि कॉन्फिगर केले जात असल्याचे ते म्हणाले.
'आम्ही आधीच 50 उपग्रह कॉन्फिगर केले आहेत आणि पुढील पाच वर्षांच्या कालावधीत ते प्रक्षेपित केले जातील. भारताने या प्रमाणात उपग्रह प्रक्षेपित केल्यास देशाला असलेले धोके अधिक चांगल्या पद्धतीने कमी करता येतील, असे सोमनाथ म्हणाले.
उपग्रह सिंथेटिक अपर्चर रडारने सुसज्ज
आम्हाला एक मार्ग सापडला आहे ज्याद्वारे जिओस्टेशनरी इक्वेटोरियल ऑर्बिट (जीईओ) ते लो अर्थ ऑर्बिट (एलईओ) पर्यंत उपग्रहांचा एक थर प्रक्षेपित केला जाऊ शकतो, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच हे उपग्रह कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडले जातील. हे सिंथेटिक ऍपर्चर रडार, थर्मल कॅमेरा, इन्फ्रारेड कॅमेरा आणि दृश्यमान कॅमेराने सुसज्ज असतील, असेही ते म्हणाले.