नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील (इस्रो) शास्त्रज्ञांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला होता. चांद्रयान-२ च्या उड्डाणापूर्वी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली होती. इस्रोमध्ये काम करणारे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून दोन अतिरिक्त पगार दिले जातात. १९९६ साली हा नियम लागू झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, आता इस्रो यशाच्या शिखरावर असताना मोदी सरकारने तडकाफडकी हे प्रोत्साहनपर अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर इस्रोमधील स्पेस इंजिनियर्स असोसिएशनने (एसईए) इस्रोच्या अध्यक्षांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.


तुम्ही सरकारशी बोलून हा निर्णय रद्द करावा. कारण, वैज्ञानिकांना या इस्रोमधील वैज्ञानिक आणि अभियंत्यांकडे वेतनाशिवाय उत्पन्नाचा अन्य कोणताही मार्ग नाही. आपातकालीन परिस्थिती उद्भवल्याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात अशाप्रकारे कपात केली जाऊ शकत नाही. यामुळे इस्रोमधील वैज्ञानिक निराश होतील. आम्हाला केंद्र सरकारच्या निर्णयाचे आश्चर्य आणि दु:ख वाटत असल्याचे शास्त्रज्ञांनी या पत्रात म्हटले आहे. 


इस्रोमधील वैज्ञानिकांना दोन अतिरिक्त पगार देण्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. जेणेकरून देशातील गुणवंत वैज्ञानिक होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. सहाव्या वेतन आयोगातही हे अनुदान सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे वैज्ञानिक इस्रोत दीर्घकाळापर्यंत टिकून राहतील, हा उद्देश होता. मात्र, आता केंद्र सरकारच्या निर्णयामुळे हे अतिरिक्त वेतन बंद झाले आहे.