सूर्यमोहिमेबद्दल ISRO कडून मोठी अपडेट, Aditya L1 ची लाँच रिहर्सल पूर्ण, काऊंटडाऊन सुरु
भारताची पहिली सूर्यमोहिम 2 सप्टेंबर 2023 ला राबवली जाणार आहे. यासाठी इस्रोमधील वैज्ञानिक सध्या दिवसरात्र मेहनत घेत आहे. यादरम्यान, इस्रोने `आदित्य एल1` मोहिमेबद्दल माहिती देताना लॉचिंग रिहर्सल आणि रॉकेटची अंतर्गत तपासणी पूर्ण झाली असल्याची माहिती दिली आहे.
चंद्रमोहीम यशस्वी झाल्यानंतर आता इस्रोला सूर्यमोहिमेचे वेध लागले आहेत. ही भारताची पहिलीच सूर्यमोहिम असणार आहे. 2 सप्टेंबरला इस्रो 'आदित्य एल1' चं प्रक्षेपण करणार असून, यान सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून हे प्रक्षेपण होणार असून, मोहीम अंतिम टप्प्यात असल्याने इस्रोचे वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. दरम्यान, इस्रोने या मोहिमेसंबंधी नवी माहिती दिली असून, लॉचिंग रिहर्सल आणि रॉकेटची अंतर्गत तपासणी पूर्ण झाली असल्याचं सांगितलं आहे.
पृथ्वीपासून 15 लाख किमी दूर जाणार यान
सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान असलेल्या ‘एल 1’ या बिंदूभोवती परिभ्रमण करत अभ्यास करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. यासाठी यान पृथ्वीपासून तब्बल 15 लाख किमीचा प्रवास करणार आहे. सौरअभ्यास करण्याच्या हेतूने इस्रोने आखलेली ही पहिली मोहीम आहे. दरम्यान ही मोहीम अशावेळी आखण्यात आली आहे, जेव्हा भारताने यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुव पृष्ठभागावर यशस्वीपणे लँडिंग केलं आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाला चंद्राच्या या भागावर जाणं जमलेलं नाही.
पीएसएलव्ही-सी 57 रॉकेटच्या माध्यमातून होणार लाँच
आदित्य एल 1 ला पीएसएलव्ही- सी 57 रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपित केलं जाणार आहे. इस्रोने ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, "प्रक्षेपणाची तयारी सध्या सुरु आहे. प्रक्षेपणापूर्वीचा अभ्यास आणि अंतर्गत तपासण्या पूर्ण झाल्या आहेत".
आदित्य एल 1 मोहिमेचा मुख्य उद्देश 'एल 1' च्या चारही बाजूंनी सूर्याचा अभ्यास करणं आहे. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा यावेळी अभ्यास केला जाईल. यासाठी यानामध्ये सात विविध उपकरणं बसवण्यात आली आहेत. या मोहिमेतून सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम तपासला जाईल. तसंच सूर्याचा पृष्ठभाग 6000 अंश सेंटीग्रेडवर असताना सर्वात वरील आवरणाचं एक दशलक्ष अंशापर्यंत कसं पोहोचतं, याचाही अभ्यास केला जाईल.
सौरमोहिमेची मुख्य उद्दिष्टं काय आहेत?
- सूर्याभोवतालच्या वातावरणाचा (क्रोमोस्फियर आणि कोरोना) अभ्यास करणे
- बाह्यपृष्ठाचे तापमान आणि सौरवादळांची स्थिती यांचा अभ्यास
- सौरवाऱ्यांची दिशा, तापमानातील फरक
- सौरवाऱ्याची उत्पत्ती, रचना आणि गतिशीलता
- सौरवादळांचा पृथ्वीवर होणारा परिणाम
- सौर कोरोनामधील चुंबकीय क्षेत्राची मांडणी आणि चुंबकीय क्षेत्राचं मोजमाप.
प्रक्षेपण लाईव्ह पाहण्याची संधी
आदित्य एल 1 चं प्रक्षेपण लाईव्ह पाहण्याची संधी आहे. इस्रोने नागरिकांना यासाठी आमंत्रित केलं आहे. ISRO ने यासंबंधी एक द्वीट करत नागरिकांना प्रक्षेपण पाहण्यासाठी आमंत्रित केलं आहे.
थेट प्रक्षेपण पाहण्याची इच्छा असणाऱ्यांना https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION/index.jsp या लिंकवर नोंदणी करावी लागणार आहे. श्रीहरिकोटा येथील लॉन्च व्ह्यू गॅलरीतून हे प्रक्षेपण पाहण्यास मिळणार आहे.