नवी दिल्ली : आज संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. भारत तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी)च्या जवानांनीही दारमा खोऱ्यात १८,००० फुटांच्या उंचीवर बर्फानं झाकलेल्या टोकावर तिरंगा फडकावत भारत मातेला सलाम केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ लडाख क्षेत्राचा आहे. उणे ३० डिग्री तपमानात आयटीबीपीचे कमांडो हातात तिरंगा घेत देशाच्या सुरक्षेत तैनात आहेत. वातावरण खराब असल्यानं या भागात बर्फाचं वादळ कधीही धडक देऊ शकतं. हिमालयाचं हे टोक अतिशय दुर्गम आणि कठिण समजलं जातं. 


आयटीबीपीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हातात तिरंगा घेत एक व्हिडिओ पोस्ट केलाय. जमिनीवर पसरलेली पांढऱ्या बर्फाची चादर आणि निळ्या-पांढऱ्या रंगाचं आकाश...आणि त्यामध्ये सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये हातात तिरंगा घेऊन चालत असलेले जवान या व्हिडिओत दिसतात.


आयटीबीपी जवानांचं काम देशातील इतर सेनेच्या तुलनेत कठिण समजलं जातं. ज्या भागांत ऑक्सीजनसोबतच खाण्या-पिण्याच्या व्यवस्थाही कमी प्रमाणात असतात अशा भागांत हे जवान तैनात असतात. बर्फाच्छादित टेकड्यांवर भारतीय सेनेचे हे वीर जवान उणे ४० डिग्री तपमान असतानाही देशवासियांना सुरक्षेची खात्री देतात.