नो टेन्शन ! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास मुदतवाढ
आयकर परतावे (ITR) भरण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे.
मुंबई : आयकर परतावे (ITR) भरण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाचा परतवा भरता येणार असल्याने नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक खासगी कंपन्यांचे फॉर्म १६ अजूनही तयार नसल्याने परताव्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आयकर विभागाने आधीची ३१ ऑक्टोबरची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.
२०१९-२० या आर्थिक वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. इन्कट टॅक्स भरण्याची मुदत पाच महिन्याने वाढवल्यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी इन्कम टॅक्स विभागानं आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवल्याची माहिती दिली.
आपण सध्या ज्या परिस्थितीत आहोत त्याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळेच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत आणखी वाढवण्यात येत आहे. आशा आहे की यामुळे करदात्यांना आर्थिक नियोजन करण्यास मदत होईल, असे ट्विटमध्ये आयकर विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, आर्थिक वर्ष २०१८-१९साठी आयटीआर भरण्याची तारीख यापूर्वीच ३१ जुलै २०२० केली आहे. त्याचबरोबर केंद्राने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदतही एक वर्षासाठी म्हणजेच ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवली आहे.