नवी दिल्ली : दिल्लीमधल्या बुराडीतल्या संतनगर भागात रविवारी एकाच कुटुंबातले ११ मृतदेह सापडले. पोलिसांना घरातून ११ मृतदेहांसोबतच काही धार्मिक नोट्स आणि या कुटुंबाचा पाळीव कुत्रा जॅकी सापडला आहे. पोलीस आता या कुत्र्याच्या मदतीनं ११ मृत्यूंचं गूढ उकलवण्याचा प्रयत्न करणार आहेत. जॅकी हा पोलिसांना या घराच्या गच्चीवर दिसला. जॅकी हा नेहमी भुंकायचा पण त्यादिवशी मात्र तो शांत होता. त्याचा आम्ही कोणताच आवाज ऐकला नाही, अशी प्रतिक्रिया शेजारच्यांनी दिली आहे. हे कुटुंब जॅकीला त्यांच्याच परिवारातील एक सदस्य मानायचं. जेव्हा जॅकी लहान होता तेव्हा त्याला घरी आणण्यात आलं होतं. घरामध्ये अनोळखी माणसानं घुसायचा प्रयत्न जरी केला तरी जॅकी जोरजोरात भुंकायचा, असं शेजारच्यांचं म्हणणं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी डॉग एक्सपर्ट बोलावले आहेत. या कुत्र्याला घरात फिरवण्यात येत आहे आणि कुत्र्याच्या इशाऱ्यांवरून या प्रकरणाचा उलगडा होतो का ते पोलीस पाहत आहेत.


पोलिसांना संत नगर भागात एकाच घरातील १० जण फाशी घेऊन मृत झालेले आढळले. तर घरातल्याच वृद्ध महिलेचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला. या सगळ्या मृतदेहांच्या डोळ्यावर आणि तोंडावर पांढरी पट्टी बांधण्यात आली होती. तर सगळ्यांच्या कानामध्ये कापूस घालण्यात आला होता. पोलिसांना घरातून दोन रजिस्टर मिळाली आहेत. यामध्ये काही धार्मिक गोष्टी लिहिल्या आहेत. या सगळ्या आत्महत्या असून धार्मिक अंधश्रद्धेतून या सगळ्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे.


पोलिसांचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सगळ्यांच्या मृत्यू फाशी घेऊन झाल्याचं समोर आलं आहे. या कुटुंबाच्या नातेवाईकांनी ही अंधश्रद्धा नाही तर हत्या असल्याचा आरोप केला आहे.


वडाच्या झाडाच्या अँगलनं पोलीस तपास


पोलिसांना घटनास्थळावर दोन वह्या मिळाल्या आहेत. या वह्यांमध्ये धार्मिक गोष्टी लिहिण्यात आलेल्या आहेत. यामध्ये वडाच्या झाडाच्या पुजेबद्दल लिहिण्यात आलं आहे. वहीमध्ये वडाच्या पुजेवर विशेष जोर देण्यात आला आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे ११ मृतदेह वडाच्या झाडाच्या पारंब्यांप्रमाणे लटकवलेल्या अवस्थेत सापडले आहेत.