चीनने पुन्हा मसूद अजहरला पाठिशी घातले, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास नकार
सुरक्षा समितीमधील १० देशांनी भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याचे समजते.
वॉशिंग्टन: पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नात चीनने पुन्हा एकदा खोडा घातला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीपुढे भारताने यासंदर्भात प्रस्ताव मांडला होता. मात्र, चीनने आपल्या नकाराधिकाराचा वापर करत हा प्रस्ताव हाणून पाडला. गेल्या दहा वर्षांमध्ये चीनने मसूद अजहरला पाठिशी घालण्याची ही चौथी वेळ आहे.
१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद संघटनेने आत्मघातकी दहशतवाद्याचा व्हीडिओ प्रसिद्ध करून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली होती. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारताने फ्रान्स, अमेरिका व ब्रिटन या देशांच्या साथीने 'जैश'चा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा संयुक्त प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीपुढे मांडला होता. पुलवामाचा हल्ला अत्यंत भीषण असल्यामुळे अनेक देशांनी तीव्र शब्दांत याचा निषेध केला होता. यामध्येही चीनचाही समावेश होता. त्यावेळी चीनने दहशतवाद्यांना शासन करण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांचा वापर करू, असेही म्हटले होते. त्यामुळे किमान आतातरी चीन मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना साथ देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली.
भारताने मांडलेल्या प्रस्तावास या प्रस्तावास आक्षेप घेण्यासाठी समितीच्या सदस्यांना १० दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपण्याच्या एक तास आधी चीनने तांत्रिक नकाराधिकाराचा वापर केला. सुरक्षा समितीमधील १० देशांनी भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याचे समजते.