मेहबूबा मुफ्तीचं अमरनाथ यात्रेविषयी धक्कादायक वक्तव्य
जवळपास ४५ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेला आठवडाभरापूर्वी सुरुवात झाली.
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर येथील पर्वतरांगांमध्ये सध्याच्या घडीला सुरु असणाऱ्या अमरनाथ यात्रेविषयी पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. पवित्र यात्रेसाठी लागणाऱ्या पूर्वतयारी आणि एकंदर परिस्थिती पाहता याचे सर्वाधिक परिणाम हे स्थानिकांच्या दैनंदिन आयुष्यावर होत असल्याचं मत त्यांनी रविवारी मांडलं.
जवळपास ४५ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेला आठवडाभरापूर्वी सुरुवात झाली. आतापर्यंत यात्रेच ६७ हजार भाविकांनी पवित्र गुहेत असणाऱ्या शिवलिंगाचं दर्शनही घेतलं. समुद्रसपाटीपासून ३,८८८ मीटर उंचीवर असणाऱ्या या गुहेपर्यंत पोहोचणारी वाट तितकी सोपी नाही. या यात्रेच्या आयोजनासाठीही खास गोष्टींवर लक्ष दिलं जात असून दरवर्षी कडेकोट सुरक्षेचे सर्व निकषही लक्षात घेतले जातात. ज्यामध्ये सीआरपीएफ, जम्मू आणि काश्मीर पोलीस यंत्रणा, भारतीय सैन्यदल आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचं मोलाचं योगदान असतं.
पहलगाम आणि बालताल अशा दोन मार्गांनी सुरु असणाऱ्या या यात्रेसाठी सर्व व्यवस्था आणि सुरक्षा पुरवण्यात येत असतानाच मेहबूबा मुफ्ती यांनी मात्र यात्रेविषयी भुवया उंचावणारं वक्तव्य केलं आहे.
'वर्षानुवर्षे अमरनाथ यात्रा सुरु आहे. पण, दुर्दैवाने यंदाच्या वर्षी यात्रेसाठी जी व्यवस्था आणि ज्या सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत त्या सर्व काश्मीरच्या नागरिकांविरोधात आहेत', असं त्या म्हणाल्या. एएनाय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना मुफ्ती यांनी अमरनाथ यात्रेमुळे स्थानिकांच्या दैनंदिन आयुष्यात बऱ्याच अडचणी निर्माण झाल्याची बाब मांडली.
स्थानिक नागरिकांना नेमक्या कोणत्या स्वरुपातील अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे स्पष्ट न करताच आपण येथील राज्यपाल सत्यपाल मलिक यांना संबंधित प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करणार असल्याचं सांगचत सरकारने या प्रकरणात लक्ष घालावं असा आग्रही सूर लावला. मुफ्ती यांचे हे आरोप पाहता सत्ताधारी भाजप आणि त्याच्यात असणारे मतभेद स्पष्टपणे सर्वांसमोर आले आहेत हे खरं.