जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईला वेग, एका शहीद जवानामागे किती दहशतवादी मारले पहा
जम्मू-काश्मिरमध्ये गेल्या दोन वर्षात सुरक्षा दलाचे १०९ जवान शहीद झाले आहेत
जम्मू-काश्मिर : जम्मू-काश्मीरमधून (Jammu Kashmir) कलम ३७० हटवून अडीच वर्षे उलटूनही खोऱ्यात शांतता प्रस्थापित झालेली नाही. विशेषत: पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे केंद्रशासित प्रदेशात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात दररोज चकमक घडत आहे.
याबाबत सरकारने संसदेत माहिती दिली आहे. जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा रद्द केल्यापासून 541 दहशतवादी घटनांमध्ये सुरक्षा दलाचे 109 जवान शहीद झाले आहेत. मात्र, प्रत्येक जवानाच्या हौतात्म्यावर चार दहशतवादीही मारले गेल्याचं सरकारने म्हटलं आहे.
गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं की, 5 ऑगस्ट 2019 पासून जम्मू आणि काश्मीरमध्ये 439 दहशतवादी मारले गेले आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात दहशतवादी हल्ल्यात 98 नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय सुमारे ५.३ कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे. दहशतवादाविरुद्ध सुरक्षा दलांच्या मोहिमेदरम्यान मात्र कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही, अशी माहिती सरकारने दिली आहे
2022 मध्येही दहशतवादविरोधी मोहीम सुरू
या वर्षी जानेवारीच्या अखेरीसही सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे.
नित्यानंद राय यांनी AIADMK खासदार विजयकुमार यांच्या प्रश्नालाही उत्तर दिलं आहे. देशात किती खासगी सुरक्षा एजन्सी कार्यरत आहेत, असा प्रश्न खासदार विजयकुमार यांनी उपस्थित केला होता. यावर राय म्हणाले की, सध्या देशात 16 हजार 427 खासगी संस्थांकडे सक्रिय परवाने आहेत. खाजगी सुरक्षा संस्था सरकारच्या परवानगीशिवाय काम करू शकत नाहीत.