जम्मू काश्मिर : जम्मू-काश्मिरातील नागरिकांना विशेष हक्क मिळणार की नाही यावर उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यघटनेतील कलम ३५अ संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या म्हणजेच सोमवारी सुनावणी होऊ शकतो. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या याचिकेवर निर्णय लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात तणाव वाढला आहे. गेल्या दोन दिवसांत जमात-ए-इस्लामी जम्मू-काश्मीर या संघटनेच्या जवळपास दीडशे जणांची धरपकड करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीर खोऱ्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी केंद्र सरकारने निमलष्करी दलाच्या १०० अतिरिक्त तुकडया जम्मू-काश्मीरमध्ये तैनात केल्यात. ही धरपकड नियमित कारवाईचा भाग असल्याचे पोलीस सांगत असले, तरीही या घडामोडींची माहिती असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, जमात-ए-इस्लामीवरील ही पहिलीच महत्त्वाची कारवाई आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर फुटीरतावाद्यांच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली असून जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक यालाही शुक्रवारी रात्री ताब्यात घेण्यात आले आहे.



घरांवर छापे 


काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना मिळणाऱ्या आर्थिक निधीचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने फुटीरतावादी नेत्यांसह अन्य काही ठिकाणी पुन्हा छापे घातले. यामध्ये पाकिस्तानी चलनासह अन्य परदेशी चलन हस्तगत करण्यात आल्याची माहिती एनआयएच्या अधिका-यांनी दिली. या छाप्यांमध्ये काही हजार पाकिस्तानी रुपये तसेच संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाचे चलन तसेच काही कागदपत्रे आढळली. ही सर्व कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएच्या प्रवक्यांनी दिली.यात सय्यद अली शाह गिलानी याच्या नेतृत्वाखालील तेहरीक-ए- हुर्रियतचा प्रवक्ता अयाझ अकबर याच्या घरी छापे घालण्यात आले.