श्रीनगर : काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या अमरनाथ यात्रेकरता हजारो भाविकांची पावलं ही पवित्र अमरनाथ गुहेच्या दिशेने वळू लागली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची होणारी गर्दी आणि निसर्गाचे बदलते रंग पाहता यात्रेकरुंना कोणत्याही प्रकारची अडचण उदभवू नये यासाठी सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. यामध्ये मोलाचा हातभार लाभत आहे तो म्हणजे आयटीबीपी जवानांचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समुद्रसपाटीपासून, ३,८८८ मीटर इतक्या उंचीवर असणाऱ्या अमरनाथ गुहेतील पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी अनेक मैलांचा प्रवास भाविक पार पाडतात. यामध्ये त्यांना अनेक आव्हानांचटाही सामना करावा लागतो. त्यातीलच एक म्हणजे ऑक्सिजन अर्थात प्राणवायूची कमतरता. 


समुद्रसपाटीपासून यात्रेकरु जसजसे पुढता प्रवास करतात तसतसं हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण विरळ होत जातं, परिणामी अशा वेळी इतक्या उंचीवर त्यांच्या मदतीला धावणारे हात म्हणजे आयटीबीपी अर्थात इंजो तिबेटीयन पोलीस फोर्सचे. आपल्या कर्तव्यास तत्पर असणाऱ्या या आयटीबीपी जवानांनी आतापर्यंत अनेक भाविकांची मदत केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत जवळपास ५० हून अधिक यात्रेकरुंना ऑक्सिजनअभावी उदभवलेल्या श्वसनाच्या त्रासातून सावरण्यासाठी जवानांकडून मदत देण्यात आली आहे. 



कोणतंही नातं नसताना मोठ्या आपुलकीने आणि आत्मियतेने हे जवान श्रद्घाळूंच्या सेवेत रुजू आहेत. त्यांची हीच कृती पाहून कित्येक भाविकांनीही त्यांना सलाम केल्याचं पाहायला मिळालं. नात्यांची ही अनोखी गुंफण आणि त्याला मिळालेलं भक्तीचं हे रुप पाहता यात्रेच्या या वातावरणातील उत्साह आणखी द्विगुणित होत आहे.