Accident News : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) काझीगुंड (Qazigund) येथे शुक्रवारी व्हॅनला ट्रकची धडक बसल्याने मोठा अपघात घडलाय. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत लेव्हडोरा परिसरात व्हॅनने लेन बदलण्याचा प्रयत्न केला असताना हा अपघात झाला आहे. हा भीषण अपघात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. अपघात इतका भीषण होता की व्हॅनचा चेंदामेंदा झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह (JK Police) स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कुटुंबातील सदस्यांना घेऊन ही व्हॅन श्रीनगरहून जात होती. लेन बदलत असताना व्हॅन विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली आणि अपघात झाला. हा अपघात सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. अपघातामुळे व्हॅनमधील लोक महामार्गावर अक्षरक्षः फेकले गेले आणि गाडी उलटी झाली.


"नोंदणी क्रमांक  JK06B 0901 असलेले वाहन श्रीनगरहून काझीगुंड येथील अक्रोड कारखान्यात जाणाऱ्या ट्रकला धडकले. अपघातामुळे इको वाहनातील सातही प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ काझीगुंड आपत्कालीन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे," अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.



लेव्हडोरा येथे हा अपघात घडला आहे. व्हॅन ट्रकवर आदळल्यानंतर जखमींना काझीगुंड येथील आपत्कालीन रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र तिथे जखमी व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू झाला. इतर जखमींना गंभीर स्वरूपाच्या जखमांमुळे श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आणखी तिघांनी रुग्णालयात प्राण सोडले.


डोडा येथील रहिवासी नियाज अहमद भट यांचा मुलगा मारूफ अहमद भट असे व्हॅनच्या चालकाचे नाव असून, त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. मोहम्मद अब्दुल्ला यांचा मुलगा गुलाम कादीर भट, गुलाम कादिरचा मुलगा मोहम्मद नियाज भट, मुमताज अहमद भट, नियाज अहमद भट यांची पत्नी मुबिना बेगम, मोहम्मद नियाज यांची मुलगी मेहविश अख्तर असे सर्वजण व्हॅनने प्रवास करत होते. मोहम्मद नियाज यांचा मुलगा मारूफ मुमताज भट आणि मोहम्मद नियाज यांची मुलगी आबाशा बानो हे तिघेही दोडा येथील रहिवासी होते.


दरम्यान, याप्रकरणी काझीगुंड पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 279, 337 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर काझीगुंड पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.