श्रीनगर : मंगळवारी नियंत्रण रेषेपाशी पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या तोफांच्या माऱ्या आणि गोळीबारात भारतीय सैन्याती जेसीओ (ज्युनिअर कमिशन ऑफिसर) शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. जम्मू- काश्मीर स्थित राजौरी आणि पूंछ या जिल्ह्यांमध्ये ही घटना घडली. सूत्रांच्या माहितीनुसार अद्यापही या जेसीओसंदर्भातील अधिक माहिती मिळू शकलेली नाही. कलाल परिसरातील नौशेरा सेक्टरमध्ये ते तैनात होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी सैन्याकडून सतत करण्यात येणाऱ्या या तोफांच्या माऱ्यामुळे त्या भागात असणाऱ्या जवळपास सहा ते सात शाळांमधील विद्यार्थीही अडकले होते. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून मेंढर आणि बालाकोट भागांमध्ये शस्त्रसाठा तैनात करण्यात आला होता. ज्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी मेंढर येथील Goladमध्ये शेतात काम करणाऱ्या एक ५५ वर्षीय महिला जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 



पाकिस्तानकडून मारा करण्यात आलेल्या तोफगोळ्यांचा भारतीय सैन्याकडून नायनाट करण्यात आला आहे. सोमवारपासूनच सीमेपलीकडून अशा प्रकारच्या हालचालींना सुरुवात झाली होती. तर, दुसरीकडे पूंछमधील कसबा आणि केरनी या भागांमध्येही पाकिस्तानी सैन्यदलाकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रांच्या सीमांवर एकंदरच तणावाच्या वातावरणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे.