श्रीनगर : जम्मू- काश्मीर येथे शोपियान भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे. शोपियानच्या अवनीरा भागात सकाळीच झालेल्या का कारवाईत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. सध्या संबंधित भागात लष्कराकडून शोधमोहिम सुरु असल्याचं कळत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू- काश्मीर येथील शोपियान भागात काही दहशतवादी लपून असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. ज्यानंतर लगेचच या भागात शोधमोहिम सुरू करण्यात आली. बराच परिसर पिंजून काढण्यास सुरुवात झाली. यादरम्यानच दहशतवाद्यांच्या बाजूने गोळीबारास सुरुवात झाली. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरुव करताच त्याला लष्कराकडूनही उत्तर देण्यात आलं. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले.


जम्मू- काश्मीरमधील, काश्मीर खोऱ्याच्या भागात असणाऱ्या अनेक लहान गावांमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी आणि लष्करासोबतच्या चकमकींचं प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचं लक्षात येत आहे. सतर्कतेचे सर्व निकष पाळूनही दहशतवाद्यांची घुसखोरी मात्र काही अंशी लष्करासाठी आणि तेथील स्थानिकांसाठी अडचणी निर्माण करत आहे.