श्रीनगर : काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई सुरु आहे. जम्मू-काश्मीरमधील त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपुरा क्षेत्रातील चेवा उलर, त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. 



याआधी गुरुवारीही त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांना एका गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस, 42 आरआर आणि सीआरपीएफ कार्डन यांच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं.


दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या संयुक्त पथकाने दहशतवादी लपले असलेल्या भागात घेराव घातला त्यावेळी, दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. त्यानंतर सेनेकडून प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारानंतर चकमक सुरु झाली. 


गुरुवारी सुरक्षा दलाकडून हे दुसरं सर्च ऑपरेशन करण्यात आलं. त्याआधी सकाळी सोपोर जिल्हातील बारामुल्लामध्ये एका गावात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. 


यावर्षात काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या 108वर पोहचली आहे. तर केवळ जून महिन्यात 37 दहशतवादी मारले गेले आहेत.