BJP MLA Shagun Parihar: जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडी सरकार स्थापन करणार आहेत. विधानसभा निवडणूकीतील 90 जागांपैकी  काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने 49 जागा पटकावल्या आहेत. दोन पक्षांकडे बहुमत असल्याने ते सत्तास्थापनेचा दावा करतील. या निवडणुकीत भाजपाला 29 जागांवर समाधान मानावं लागलंय तर इतरांना 9 जागा मिळाल्यात. भाजपच्या या यशात किश्तवाड येथील मतदार संघाची जास्त चर्चा होतेय. येथे शगून परिहार या तरुणीनं सर्वाधिक मत मिळवून आमदारकी पटकावली आहे. पण नवनिर्वाचित आमदार शगुनच्यामागे मोठी कहाणी आहे. तिच्याबद्दल जाणून घेऊया.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार शगुन परिहार विजयी झाल्या आहेत. त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार आणि माजी मंत्री सज्जाद अहमद किचलू यांचा 521 मतांनी पराभव केला. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, 2018 मध्ये शगुनचे वडील अजित परिहार आणि तिचे काका अनिल परिहार यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. शगुनचे काका अनिल परिहार हे भाजपचे प्रदेश सचिव होते. यानंतर शगुन यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. किश्तवाडच्या मतदारांनी शगुन यांच्या पारड्यात मते टाकली. आता शगुन यांच्या विजयाने भाजपला या भागात आपले स्थान बळकट होण्याची आशा आहे.


भाजपने नॅशनल कॉन्फरन्सचा बालेकिल्ला फोडला 


किश्तवाड हा नॅशनल कॉन्फरन्सचा बालेकिल्ला होता पण 2014 मध्ये भाजपने पहिल्यांदाच ही जागा जिंकली होती. त्यावेळी भाजपचे उमेदवार सुनील शर्मा विजयी झाले होते. आता पुन्हा एकदा भाजपने 2024 मध्ये ही जागा काबीज केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचा बालेकिल्ला फोडण्यात भाजपला यश आले आहे.


कोण आहेत शगुन परिहार?


किश्तवाडच्या नवनिर्वाचित आमदार शगुन परिहार या सुशिक्षित आमदार म्हणून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांनी इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टममध्ये एम.टेक केले आहे. सध्या त्या पीएचडी करत आहेत. यासोबत त्या जम्मू-काश्मीर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारीदेखील करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शगुन यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार केला नव्हता. पण 26 ऑगस्ट रोजी भाजपने त्यांना किश्तवाडचे उमेदवार घोषित केले. पक्षाच्या या निर्णयानंतर शगून यांना आश्चर्याचा धक्का बसला. पक्षाने दिलेली ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली.  शगुन परिहार यांना रिंगणात उतरवून भाजपने मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही समुदायांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. त्यात पक्षाला बऱ्यापैकी यश आल्याचे दिसून आले आहे. शगून यांनी पक्षाचा विश्वास सार्थकी ठरवला आहे. भाजप नेते विनोद तावडे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन नवनिर्वाचित आमदार शगून परिहार यांना शुभेच्छा दिल्या.