दहशतवादी हल्ल्याचा कट फसला, बसमधून स्फोटकं जप्त
जम्मू-काश्मीरच्या पुँछ भागात पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय भूभागावर गोळीबार केला
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट फसलाय. जम्मूच्या बस स्टँडजवळ एका बसमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं आढळून आली आहेत. बसमधून १५ किलोंची स्फोटकं सापडल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय. कठुआ जिल्ह्याच्या बिलावरहून ही बस जम्मूला दाखल झाली होती. उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वी कठुआच्या बिलावर भागात ४० किलो स्फोटकं सापडली होती. बिलावर कठुआ जिल्ह्यातील एक भाग आहे.
मंगळवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या पुँछ भागात पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय भूभागावर गोळीबार केला. पाकिस्तानकडून शाहपूर केरनी सेक्टरमध्ये मोर्टार फायरिंग करण्यात आलं. भारतीय सेनेनंही पाकिस्तानला प्रत्यूत्तर देत गोळीबार केला.
याशिवाय, काश्मीरच्या गांदरबलमध्ये २८ सप्टेंबर रोजी झालेल्या एन्काऊंटरमध्ये आणखी एक दहशतवादी मारला गेल्याची माहिती हाती येतेय. त्या दिवशी एकूण तीन दहशतवादी ठार झाले होते. हे एन्काऊंटर अद्यापही सुरू असल्याचं सांगण्यात येतंय.