कलम ३७० रद्द झाल्यानंतर मेहबुबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला ताब्यात
जम्मू काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या दोघांना त्यांच्या घरातून हरीसिंग पॅलेसमध्ये हलवण्यात आलं आहे. रविवारी संध्याकाळी या दोन्ही नेत्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.
केंद्र सरकारने सोमवारी राज्यसभेमध्ये जम्म-काश्मीर पुनर्गठन विधेयक २०१९चा प्रस्ताव ठेवला. या विधेयकाच्या बाजूने १२५ मतं आणि विरोधात ६१ मतं पडली. हे विधेयक मांडण्याच्या आधी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवली होती.
त्याआधी मेहबुबा मुफ्तींनी ट्विटरवर एक ऑडिओ प्रसिद्ध केला होता. यामध्ये आजचा दिवस इतिहासातला सगळ्यात काळा दिवस असल्याचं त्या म्हणाल्या. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानसोबत न जाऊन आमच्या पूर्वजांनी चूक केली, अशी प्रतिक्रिया मेहबुबा मुफ्तींनी दिली.
राज्यसभेमध्ये हे विधेयक मंजूर झाल्यानंतर मंगळवारी हे विधेयक लोकसभेमध्ये मंजुरीसाठी येईल. लोकसभेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे हे विधेयक सहज मंजूर होईल, हे निश्चित आहे. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे कलम ३७० सोबतच कलम ३५ एदेखील रद्द करण्यात आलं आहे.